

निमगाव दावडी(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे आगार म्हणून पूर्वीपासून खेड तालुका ओळखला जातो, परंतु तीन वर्षांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा लावायचा की नाही, या विचारात शेतकरी आला आहे. खते, लागवड खर्च, वाढती मजुरी, महागडी औषधे, रासायनिक खते, त्यातच ढगाळ हवामान आले की पुन्हा औषधांचा डोस, काढणी, ट्रॅक्टर खर्च हे विचारात घेतले तर हातात अल्प पैसे शिल्लक राहात आहेत. त्यातच यावर्षी पुन्हा कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
या वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर परतीच्या पावसात कांदा रोपे वाया गेली. ज्या शेतकर्यांची रोपे तरली त्यांनी अगाप लागवडी केल्या. अगाप लागवडीस चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती सुद्धा फोल ठरल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
ढोरे भांबुरवाडी येथील सोसायटी संचालक सत्यवान भांबुरे म्हणाले, मी अनेक वर्षे आधुनिक पद्धतीने कांदापीक घेत आहे.
परंतु बाजारभावाची गाठ होत नसल्याने अडचणी येत आहे. मी जैविक शेतीकडे वाटचाल करताना ट्रायकोड्रामा व जिवाणू खतांचा वापर केला. सहा एकर कांदा क्षेत्रात लागवड करून मागील आठवड्यात 11 ते 12 रुपये प्रतिकिलो भाव त्यांना मिळवला. परंतु कांद्याचा भाव अचानक कोसळला आहे.
मागील आठवड्यात एकरी 22 हजार रुपये खर्च आला होता. खते, औषधे, मजुरी, डिझेल खर्च, तोलाई, सेस, हमाली, तोलाई असा सर्व खर्च विचारात घेतला तर एकरी 50 हजार रुपयांहून अधिक खर्च होतो आणि त्या तुलनेत हातात फारच कमी रक्कम उरत आहे. परिणामी कांदा लागवडीचा फेरविचार करण्याची वेळ आता आली आहे.