काशिनाथ पिंगळे :
लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी अजून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी तसेच वारकरी यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, पाऊस कधी पडेल, या आशेवर शेतकरी आहेत. शेतात जी पिके आहेत ती जळून जाऊ लागली आहे, तसेच चारापिकेही संपत आल्याने शेतकर्यांपुढे जनावरांची चा-याची समस्या निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस पडेना आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणीही मिळेना या चिंतेने येथील ग्रामस्थ अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
बारामती तालुक्यातील शेतकर्यांना गेल्या दोन महिन्यांपासून शेती सिंचनासाठी असलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाण्याची मागणी करून पैसे भरूनदेखील पाणी मिळत नाही. यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यातील शेतकरी अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नाझरे कार्यालय या ठिकाणी 20 दिवसांपूर्वी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी एकदिवसीय जनआक्रोश आंदोलन करण्यात आले होते. या वेळी येथील शेतकर्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले होते. वेळेत पाणी मिळावे, बेकायदेशीर वॉल्व्ह बंद करण्यात यावेत, उच्च दाबाने पाणी मिळावे, आदी विविध मागण्यासाठी शेतकर्यांनी हे आंदोलन केले होते.
या वेळी बारामती तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना लाभक्षेत्राच्या गावातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी कार्यकारी अभियंता एम. बी. कानेटकर यांनी शेतकर्यांना लवकरात लवकर पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु यातील काही भागाला पाणी मिळाले तर काही भाग अजूनही आहे तसाच आहे. त्या ठिकाणी अजूनही पाणी पोहोचलेले नाही. तेथील शेतकरी अजूनही पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अधिकार्यांच्या नावाने ओरडत आहेत.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अधिकार्यांना पाण्याच्या चौकशी संदर्भात फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत तसेच फोन उचलल्यास व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. पैसे भरूनही पाणी मिळत नाही, पंप बंद आहे, अशी उडवाउडवीची ते उत्तरे देतात.
– गंगाराम गुलदगड, शेतकरी, पळशी
हे ही वाचा :