

पेठ (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अति उष्णतेने सातगाव पठार भागातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पोल्ट्रीतील कोंबड्या अति उष्णतेने मृत्युमुखी पडत आहेत. कोंबडी खाद्य महागले असताना आता वाढीव वीजबिलाच्या काळात पोल्ट्रीत पंखे बसवावे लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
दिवसभर अतिशय कडक ऊन, रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत थंड वातावरण पक्ष्यांना धोकादायक असते. अशा परिस्थितीत पक्ष्यांना जगवण्यासाठी तसेच त्यांचे वजन वाढण्यासाठी शेडच्या पत्र्यावर ओले बारदाने टाकून त्याला प्रेशर पाईपने सतत थंड पाणी फवारावे लागते. विहिरीतील पाणी तळाला गेल्याने पाणी विकत टँकर घ्यावे लागत आहे. एवढेच नव्हे पोल्ट्रीत जागोजागी मोठे फॅन बसवावे लागत आहेत.
पशुवैद्यकांची तपासणी फी व औषधे, खाद्य महागलेली आहेत. त्यातच हा नवा भुर्दंड पडल्याचे पोल्ट्री व्यावसायिक दत्ता पवळे, अतुल बुट्टे यांनी सांगितले. उन्हाळ्यात कोंबड्या खाद्य कमी खातात, परिणामी त्यांचे वजन कमी भरते. हे टाळण्यासाठी पोल्ट्रीत पंखे लावून गारवा करावा लागत आहे. त्याचे मोठे बिल व्यावसायिकांना भरावे लागत आहे.