मंचर; पुढारी वृत्तसेवा : घरगुती गॅस सिलिंडरचे बाजारभाव अकराशे रुपयेपर्यंत गेला आहे. सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणार्या कुटुंबांना सिलिंडर घेणे परवडत नसल्याने गरीब व मागासवर्गीय महिला दोन वेळचे जेवण बनविण्यासाठी गावात लाकूडफाटा गोळा करून कुटुंबाचा निर्वाह करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सिलिंडरची टाकी अकराशे रुपये, तर 40 किलो मन सरपणाला 320 रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाने प्रपंच चालवायचा कसा, असा प्रश्न महिलांना पडला आहे.
सर्वसामान्य गरीब कुटुंबाला पाचशे रुपयांत भरलेली गॅस टाकी मिळावी, अशी मागणी महिलावर्ग करत आहे. आजही मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंब असून, रोजंदारीवर कामावर गेल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही. सर्वच गावांमध्ये राहणार्या मागासवर्गीय कुटुंबातील तरुणांना नोकर्या व उद्योग नसल्याने मिळेल ते काम करत असतात. परंतु, ग्रामीण भागात दररोज काम नसल्याने बरीचशी कुटुंबे आर्थिक अडचणीत असल्याचे पाहावयास मिळत आहेत.
दोन वर्षांपूर्वी सरकारी घरगुती भरलेला सिलिंडर पाचशे रुपयाला मिळत होता. आता मात्र सिलिंडरची भरलेली टाकी 1100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबांना शंभर रुपयात मोफत गॅस कनेक्शन वाटप केले. मात्र, भरलेल्या टाकीला कोणतेच अनुदान मिळत नसल्याने बहुतांश मागासवर्गीय कुटुंबांनी गॅस सिलिंडरची रिकामी टाकी, शेगडी अडगळीत ठेवली आहे. महिला दिवसभर भटकंती करून सरपण गोळा करून दोनवेळचे जेवण बनवत आहेत. केंद्र, महाराष्ट्र शासनाने गरीब व मागासवर्गीय कुटुंबीयांना पाचशे रुपयांत भरलेली टाकी द्यावी, अशी मागणी महिला भगिनींनी केली आहे.