

विशाल शिर्के
पुणे : बनावट नोटा केवळ उच्च मूल्याच्या असतील, असा विश्वास भाबडा ठरेल! भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) अहवालानुसार दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या आणि आरबीआयकडे जमा होत असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटाही मोठ्या प्रमाणावर बनावट असल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 2 लाख 29 हजार 746 नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यातील 1 लाख 41 हजार 907 नोटा या पाचशे रुपयांच्या आहेत. या पाचशे रुपयांच्या नोटांचे मूल्य तब्बल 7 कोटी 9 लाख 53 हजार 500 रुपये आहे.
भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये 2023-24 च्या आर्थिक वर्षात 2 लाख 22 हजार 639 नोटा आल्या होत्या. त्यात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2 लाख 17 हजार 396 पर्यंत वाढ झाली, तर 2025-26 मध्ये हा आकडा आणखी वाढून 2 लाख 29 हजार 746 वर गेला. या तीनही वर्षांत मिळून 6 लाख 70 हजार 321 नोटा बनावट आढळल्या. या तीनही वर्षांमध्ये पाचशे रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा आढळल्या आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 या कालावधीत पाचशेच्या अनुक्रमे 85,711 व 1 लाख 17 हजार 722 आणि 1 लाख 41 हजार 907 नोटा बनावट आढळल्या. या एकूण नोटा 3,45,340 असून, त्याचे मूल्य 17 कोटी 26 लाख 70 हजार होते.
गत तीन आर्थिक वर्षात अनुक्रमे पन्नास रुपयांच्या 15,366 व 12 हजार 15 आणि 10,274 अशा 37 हजार 628 नोटा बनावट आढळल्या आहेत. त्याचे मूल्य 18 लाख 81 हजार 400 रुपये होते. गेल्या तीन वर्षांत वीस रुपयांच्या 297 व 253 आणि 373 अशी 923 नोटा नकली निघाल्या आहेत. त्यांचे मूल्य 18,460 रुपये होते. तर, दहा रुपयांच्या 235 व 159 आणि 133 अशा 545 नोटा बनावट आढळल्या आहेत. त्याचे मूल्य 5,450 रुपये होते.