

पुणे: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र व गोवा राज्याचा सदस्य असल्याचे सांगून एका तोतयाने शासकीय यंत्रणेला २० लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या महाशयांनी थेट तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना आपले बनावट लेटरहेड देऊन त्याद्वारे शासकीय विश्रामग्रहात मुक्काम ठोकून पोलिसांचे सोपस्कार घेण्यापासून ते त्यांची शासकीय सलामी घेण्याचा प्रताप केला आहे.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौगुले यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (रा. पिंपरी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. मात्र, यासंदर्भातील गुन्हा १८ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले, आरोपी धर्मेंद्र सोनकर हा स्वतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र व गोवा राज्याचा सदस्य असल्याचे सांगून मिरवत होता. त्याने २०२१ मध्ये आपल्या बनावट लेटर हेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. तो पुण्यात आला असून, त्याला प्रोटोकॉल देण्यात यावा. २४ डिसेंबर २०२१ रोजी त्याने लोणावळा येथील शासकीय विश्रामगृहाचा अनधिकृतपणे वापर केला. तसे पुणे ग्रामीण पोलिसांकडून एस्कॉर्टींग घेतले.
त्याने काही विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठाकाही घेतल्या. एवढेच नाही तर त्याने पुणे ग्रामीण पोलिसांकडून सलामी घेतली. दरम्यान, त्याची ही तोतयागिरी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या लक्षात आली. त्याने याबाबत पोलिसांना तसेच तो सांगत असलेल्या संबंधीत यंत्रणाकडून माहिती मागितली. त्यावेळी सोनकर हा तोतया असल्याचे समोर आले. पोलिसांनी देखील मागासवर्गीय आयोगाकडे या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केला. त्यावेळी आयोगाने लेखी पत्राद्वारे सोनकर हा आयोगाचा सदस्य नसल्याचे सांगितले. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.
असे फुटले तोतयाचे बिंग
सर्वात गंभीर प्रकार म्हणजे एवढे दिवस तो मिरवत असताना, त्याने दिलेले लेटरहेड खरे आहे की खोटे? तो खरोखरच संबंधीत आयोगाचा सदस्य आहे की नाही, हे एकदा पडताळून पाहण्याचे कष्ट देखील प्रशासकीय यंत्रणांनी घेतल्याचे दिसून येत नाही. उलट त्याने दिलेल्या लेटरहेडची दखल घेत त्याला सर्व शासकीय प्रोटोकॉल पुरवले. मात्र एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केलेल्या पाठपुराव्यात तोतयाचे अखेर बिंग फुटले.