पहिल्याच पेपरला ‘फजिती’
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सुमारे 22 ते 23 महिने ऑनलाईन शिक्षण आणि लेखनाचा सराव तुटल्याने दोन वर्षानंतर ऑफलाईन परीक्षेला सामोरे गेलेल्या बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांची 'फजिती' झाली. शुक्रवारी (दि. 4) इंग्रजी विषयाचा पेपर सोडविताना अनेकांचा गोंधळ उडालेला दिसून आला.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या इयत्ता बारावी परीक्षेस शुक्रवारी सुरुवात झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यास परिपूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे पेपर अवघड गेला, अशी प्रतिक्रीया काही विद्यार्थ्यांनी दिली.
तर लेखनाचा सराव मोडल्याने पेपर सोडविता-सोडविता दमछाक झाल्याचे काहींनी सांगितले. अभ्यास होऊनही केवळ सरावाअभावी निम्मा पेपरही सोडवू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर केंद्रातून बाहेर पडल्यावर तणाव दिसून आला.
अर्धा तासाचा वाढीव वेळ
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे यंदा ऑफलाइन परीक्षा घेतली जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील 31 हजार 528 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसले आहेत.
ऑनलाइन शाळेमुळे लिखाणाची सवय नसल्याने बोर्डाकडून विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे; मात्र याचा काही विद्यार्थ्यांना फायदा झाला तर काहींना विद्यार्थ्यांना वेळ अपुरा पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी
कोरोनाच्या नियमावलीनुसार परीक्षा केंद्रांवर सर्व व्यवस्था करण्यात आली होती. थर्मल स्कॅनिंगसाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला होता; तसेच हात सॅनिटाईज करूनच विद्यार्थ्यांना केंद्रांवर प्रवेश दिला जात होता.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा
परीक्षा केंद्रांवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. अंध आणि इतर प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक (रायटर्स) उपलब्ध करुन देण्यात आले होते.
पालकांना धाकधूक
परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे पालकही आले असल्याचे दृश्य होते. केंद्रांवर परीक्ष क्रमांकानुसार वर्ग शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरु होती. पालकांच्याही चेहर्यावर काळजी दिसून येत होती. विचार करुन पेपर सोडव, असा सल्ला पालक आपल्या पाल्यांना देताना दिसत होते. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी मित्र -मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छाही व्यक्त करत होते.
'सीसीटीव्ही'चा वॉच
काही ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे कॉपी किंवा गैरप्रकार टाळले गेले. पेपर संपल्यानंतर पेपर कसा होता, म्हणून विद्यार्थी एकमेकांना विचारताना दिसून येत होते.

