पीएमपी उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठेना; दिवसाला दोन कोटींचे लक्ष्य कधी गाठणार?

पीएमपी उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठेना; दिवसाला दोन कोटींचे लक्ष्य कधी गाठणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीचा पदभार घेतला की, अधिकारी सर्वप्रथम पीएमपीचे दिवसाचे उत्पन्न दोन कोटींपेक्षा पुढे नेण्याचे टार्गेट हाती घेतात. मात्र, त्या अधिकार्‍यांकडून हे दिवसाचे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे टार्गेट काही केल्या ओलांडले जात नाही. त्यामुळे पीएमपीचे अधिकारी हे टार्गेट ओलांडून पीएमपीला सुगीचे दिवस कधी आणणार? असा सवाल प्रवासी आणि पीएमपी तज्ज्ञांकडून केला जात आहे.

पीएमपीच्या ताफ्यात 2089 गाड्या आहेत. त्यापैकी 1600 ते 1700 बस दररोज मार्गावर असतात. त्यांच्या माध्यमातून 12 ते 13 लाख पुणेकर प्रवासी प्रवास करतात. त्याद्वारे पीएमपीला दिवसाला एक कोटी 50 लाख अथवा एक कोटी 60 ते 70 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. हेच उत्पन्न दोन कोटी आणि त्यापेक्षा अधिक करण्यासाठी पीएमपीकडील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, वर्षा- सहा महिन्यांतील एखादा अपवाद दिवस वगळता, टार्गेट पूर्ण करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. पीएमपीच्या उत्पन्नाची गाडी दीड कोटींच्याच घरात अडकली आहे. आता हे टार्गेट पीएमपीचे नवे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर पूर्ण करू शकणार की नाहीत, हे आगामी काळात पाहावे लागणार आहे.

पीएमपीचे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहे. ताफ्यात बसची संख्या कमी आहे, उत्पन्न वाढीसाठी आम्ही नवीन बसची खरेदी करणार आहे. तसेच, उत्पन्न वाढीसाठी आम्ही मार्गांचे सुसूत्रीकरण केले आहे. यासोबतच जाहिराती, बस शेल्टर आणि मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

– डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

तिकिटांव्यतिरिक्त येथून मिळते उत्पन्न

पुण्यातील पीएमपीच्या अनेक मालमत्ता आहेत, यात कँटीन बिल्डिंग, स्वारगेट डेपो बिल्डिंग, इन्कम टॅक्स ऑफिस (विठ्ठलराव गाडगीळ भवन), डेक्कन शिरोळे भवन, नतावाडी डेपो इमारत, कोथरूड स्टँड इमारत, पुणे स्टेशन आगार इमारत, हडपसर आगार इमारत, मार्केट यार्ड इमारत या नऊ पीएमपीच्या मालकीच्या इमारतीतील 101 मिळकतीमधून पीएमपीला तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. तसेच, बसथांबे, बसगाड्यांवरील आणि इतर जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळत आहे. त्यासोबतच पीपीपी तत्त्वावरील बस शेल्टर आणि खासगी वाहने चार्जिंग करण्याची चार्जिंग स्टेशन यांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न पीएमपीच्या जमाखर्चाच्या द़ृष्टीने खूपच कमी आहे. प्रशासनाच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत असून तोटा कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला मोठ्या पातळीवर निर्णय घेऊन कामे करावी लागणार आहेत.

पीएमपीची वाढतेय आर्थिक चणचण

पीएमपीएमएलची स्थापना झाली तेव्हा 2007 साली पीएमपीचे वार्षिक उत्पन्न 396 कोटी होते, तर खर्च 411 कोटींपर्यंत येत होता. यावरून त्या वेळी पीएमपीला 15 कोटींचा तोटा येत होता. हाच तोटा आत्ताच्या काळात वाढला असून, सन 2021-22 मध्ये हा तोटा 718 कोटींपर्यंत गेला आहे. आणि 2022-23 या वर्षांत हाच तोटा सुमारे 696 कोटींपर्यंत होता, आता 2023-24 मध्ये पीएमपीचा तोटा किती वाढला असेल, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात असून, तो तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

8 ते 14 एप्रिलदरम्यान  मिळालेले उत्पन्न

  • दि. 8 1 कोटी 66 लाख 24 हजार 719
  • दि. 9 1 कोटी 17 लाख 68 हजार 581
  • दि. 10 1 कोटी 63 लाख 29 हजार 037
  • दि. 11 1 कोटी 42 लाख 87 हजार 573
  • दि. 12 1 कोटी 65 लाख 17 हजार 407
  • दि. 13 1 कोटी 50 लाख 58 हजार 206
  • दि. 14 1 कोटी 26 लाख 06 हजार 336

सात दिवसांतील एकूण उत्पन्न

10 कोटी 31 लाख 91 हजार 859

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news