दिव्यांगांसाठीच्या सुविधा कागदावरच! मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव

दिव्यांगांसाठीच्या सुविधा कागदावरच! मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी तयार केलेले लाकडी फळ्यांचे रॅम्प… त्यामुळे दिव्यांग मतदारांची झालेली गैरसोय… मदतीसाठी उपलब्ध नसलेले मतदान केंद्रावरील मदतनीस अन् दिव्यांगांसाठी केंद्रावर उपलब्ध नसलेल्या पुरेशा व्हीलचेअर… अशा असुविधांचा सामना सोमवारी दिव्यांग मतदारांना करावा लागला. प्रशासनाने सुविधा करू असे आश्वासन दिव्यांग मतदारांना दिले खरे, पण मतदान केंद्रांवरील दिव्यांगांसाठीच्या सुविधा कागदावरच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. केंद्रावर लाकडी फळ्यांचे रॅम्प तयार केले होते, पण त्यातून जाण्यासाठी दिव्यांगांना अडचणींना सामोरे जावे लागले. या असुविधेमुळे अनेक दिव्यांग मतदारांना मतदानही करता आले नाही.

पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर व मावळ या तीन लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान झाले. दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी 28 प्रकारच्या सुविधा पुरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी असलेल्या दिव्यांगांची संख्या 75039 आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 3357 व्हीलचेअर, तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी 5118 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी पुरेशा सुविधा नसल्याने दिव्यांग मतदारांचे हाल झाले, असे संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी सांगितले.

अनेक दिव्यांग मतदानापासून वंचित

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिव्यांग व्यक्तींच्या विशेष गरजा लक्षात घेऊन सक्षम अ‍ॅपद्वारे मागणी केलेल्या सुविधा उपलब्ध करून देणे, दिव्यांगांसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर करणे, रॅम्प, पुरेशा व्हीलचेअर, दिव्यांगांची स्वतंत्र रांग, दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, पार्किंग, ब्रेल लिपीतील साहित्य अशा विविध प्रकारच्या 28 बाबी निश्चित केलेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी यांपैकी काही सुविधांचा अपवाद वगळता अनेक सुविधा नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही, असे दिव्यांग मतदारांनी सांगितले.

श्री शाहू मंदिर महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर दिव्यांग, वयोवृद्ध तसेच विविध आजारांनी ग्रस्त मतदारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. मदतीसाठी मदतनीस नव्हते, पाण्याची व्यवस्थाही नव्हती. दिव्यांग मतदारांना कोणतीही मदत वा सहकार्य केले जात नव्हते. निवडणूक आयोगाने सुचविलेल्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी आलेल्या योजना फक्त कागदावरच होत्या. सुविधा नावापुरत्या होत्या, नावाला रॅम्पसाठी एक फळी टाकली होती. मी स्वतः दिव्यांग असून, कोणीही मदतीला आले नाही. बूथ लेवल अधिकारीही भेटले नाहीत.

– हरीश आल्हाट, अध्यक्ष, प्रहार दिव्यांग शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटना

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news