खंडणीखोरांचे कॉल सेंटर उद्ध्वस्त; ‘लोन अ‍ॅप’प्रकरणी पुणे पोलिसांची बंगळुरुमध्ये जाऊन कारवई

खंडणीखोरांचे कॉल सेंटर उद्ध्वस्त; ‘लोन अ‍ॅप’प्रकरणी पुणे पोलिसांची बंगळुरुमध्ये जाऊन कारवई
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चायनीज फ्रॉडच्या माध्यमातून एका महिलेला मोबाइलमध्ये 'लोन अ‍ॅप' डाउनलोड करायला सांगून तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन एक लाख अकरा हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बंगळुरू येथील नऊ जणांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी 'लोन अ‍ॅप' फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई करीत कॉल सेंटर उद्ध्वस्त केले आहे.

आरोपींनी या महिलेच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे व माहिती चोरली. त्यानंतर ही छायाचित्रे मॉर्फ करत त्यावर बदनामीकारक संदेश लिहून संपर्क यादीतील लोकांना पाठवीत महिलेला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे. न्यायालयाने या नऊ जणांना सात ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बारायडू, आकाश एम. व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस., दीपिका एल. (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात खंडणी, फसवणूक, अब्रुनुकसानी, धमकावणे आदी विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तीस वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 फेब—ुवारी ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन घडला.

विविध बँकेत स्वीकारले पैसे
आरोपींनी विविध व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून पीडितेला धमकावत पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींना सीमकार्ड व बँक खाती कोणी पुरवली, याची चौकशी करायची आहे. आरोपींनी उकळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करून खंडणीची रक्कम हस्तगत करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

चालवत होते बनावट कॉल सेंटर
आरोपी बंगळुरूमध्ये बनावट कॉल सेंटर चालवत होते. 'लोन अ‍ॅप' डाउनलोड करणार्‍यांच्या मोबाइलमधील छायाचित्रांसह माहितीचा आरोपी वापर करायचे. त्यानंतर पीडित व्यक्तींना बनावट व्हॉट्सअप व इतर मोबाइल क्रमांकाद्वारे धमकावायचे. पीडित व्यक्तींबद्दलचा बदनामीकारक संदेश त्यांच्या संपर्क यादीतील लोकांना पाठविण्याची धमकी देऊन कर्जाची रक्कम व्याजासहित परत करण्याच्या नावाखाली खंडणीची मागणी करीत होते, असे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले

हजारो जणांचा सापडला डेटा
'लोन अ‍ॅप'चा वापर करून गुन्हा करणार्‍या टोळीत आरोपींचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्याकडे हजारो जणांचा डेटा सापडला आहे. या सर्व लोकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याची शक्यता आहे. या आरोपींना डाटा व तांत्रिक मदत करणार्‍या आरोपींचा शोध घ्यायचा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news