
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी 21 ते 24 जून दरम्यान राबविण्यात येणार होती; परंतु विद्यार्थी, पालक व काही कनिष्ठ महाविद्यालये यांच्या मागणीनुसार तसेच फेरीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी नियमित फेरी 1 अंतर्गत प्रवेश घेण्याची वेळ सोमवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच दुसर्या फेरीचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत कॅपमधून 22 हजार 703, तर कोटा प्रवेशातून 3 हजार 835 अशा एकूण 26 हजार 538 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या फेरीत 42 हजार 239 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, 23 हजार 351 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशाठी 324 महाविद्यालयांत 88 हजार 445 कॅपच्या तसेच 24 हजार 945 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 13 हजार 390 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी कोटा आणि कॅप मिळून 26 हजार 538 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
तर प्रवेशासाठी 86 हजार 852 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. महाविद्यालयांचे नव्वदीपार कटऑफ आणि विद्यार्थ्यांची नामांकित महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेण्याची ओढ यामुळे पहिल्या फेरीत अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांचे अकरावीच्या दुसर्या फेरीकडे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :