

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला वेग देणे गरजेचे असून, त्यासाठी सर्व यंत्रणांना गतिमान करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी, पीएमएवाय आदीविषयक सादरीकरण केले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो प्रकल्पाचे, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी मेट्रो तसेच रिंगरोडबाबत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हर घर जल, पीएमएवाय- ग्रामीण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदींबाबत सादरीकरण केले. बैठकीस पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींसह केंद्र शासनाच्या विभागाचे तसेच राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.