लोणावळा : द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल : मुख्यमंत्री शिंदे

लोणावळा : द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल : मुख्यमंत्री शिंदे
Published on
Updated on

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून, तो लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर 2023 हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

लोणावळा येथील बोगद्याच्या कामाची पाहणी
मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.

जगातील सर्वांधिक रुंदीचा बोगदा
'मिसिंग लिंक' प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी 8 कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी 23.75 मीटर असून देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वांधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रवास सुखकर होणार
ते पुढे म्हणाले, 'या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार असून, इंधनाची तसेच वेळेची बचत होईल.

असा आहे 'मिसिंग लिंक' प्रकल्प
'मिसिंग लिंक' प्रकल्पांतर्गत लोणावळा (सिंहगड संस्था) ते खालापूर पथकर नाक्यापर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करण्याचे काम सुरू आहे.
खालापूर टोलनाका ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाचे 8 पदरीकरणाचे 5.86 कि.मी.चे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. या लांबीमध्ये 3 मोठे पूल, लहान पूल, पाईपकल्व्हर्ट, बॉक्सकल्व्हर्ट अंतर्भूत असून सद्य:स्थितीत 90 टक्के पेक्षा पूर्ण झाले आहे.
व्हायाडक्ट क्र. 1 मध्ये 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूल असून, डाव्या बाजूचे डेस्क स्लॅबचे व उजव्या बाजूच्या खांबांचे (पियर) बांधकाम प्रगतिपथावर आहे. व्हायाडक्टची डावी अंदाजे डिसेंबर 2022 तसेच उजवी बाजू पूर्ण होण्यासाठी मार्च 2023 एवढा कालावधी लागणार आहे.

बोगदा क्र. 1 : बोगदा क्र. 1 च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण 1 हजार 560 मीटरपैकी 1 हजार 451 मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे. डाव्या बोगद्याचे एकूण 1 हजार 530 मीटरपैकी 1 हजार 455 मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.

व्हायाडक्ट क्र. 2: व्हायाडक्टक्र. 2 हा 650 मीटर लांबीचे दोन समांतर केबल पूल असून पायलॉनचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये एकूण 4 पायलॉन समाविष्ट असून, त्याची उंची 181.78 मीटर एवढी आहे. हा व्हायाडक्ट सर्वोच्च उंचीच्या व्हायाडक्टपैकी एक आहे. व्हायाडक्ट पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी डिसेंबर 2023 पर्यंत आहे.

बोगदा क्र. 2 : बोगदा क्र. 2 च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण 8 हजार 776 मीटरपैकी 7 हजार 696 मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून, डाव्या बोगद्याचे एकूण 8 हजार 822 मीटरपैकी 7 हजार 529 मीटर (पुण्याकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगद्यांची रुंदी 23 मीटर असून आशिया खंडातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे. मुंबई व पुण्याकडे जाणारे दोन्ही बोगदे दर 300 मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेजद्वारे जोडण्यात येत आहेत.

कुसगाव येथील डायव्हर्जन रोड : कुसगाव येथील बोगदा क्र. 2 च्या एक्झिटच्या ठिकाणी सध्याच्या द्रुतगती मार्ग वळण (डायव्हर्जन) मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून कामाची डावी बाजू नोव्हेंबर 2022 व उजवी बाजू डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. हा रस्ता 'मिसिंग लिंक'चा वापर न करणार्‍या वाहनांसाठी तसेच लोणावळा येथे जाणार्‍या वाहनांसाठी वापरण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news