नगरपालिका नको, महापालिकाच हवी; खडकवासला-धायरी परिसरातील नागरिकांची अपेक्षा

नगरपालिका नको, महापालिकाच हवी; खडकवासला-धायरी परिसरातील नागरिकांची अपेक्षा
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत 2017 व 2021 मध्ये समाविष्ट केलेल्या नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, उत्तमनगर, शिवणे , कोपरे, कोंढवे धावडे, धायरी, नांदोशी गावांत पुरेशा सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. मात्र, फुरसुंगीप्रमाणे स्वतंत्र नगरपालिकेला येथील माजी सरपंच, नागरिकांचा विरोध आहे. नांदेड येथे मात्र महापालिका नको, तर स्वतंत्र प्राधिकरण करण्याची मागणी होत आहे.

सौरभ मते (माजी सरपंच, खडकवासला) : स्वतंत्र नगरपालिका नको. आम्हाला महापलिकाच विकास करेल, अशी आशा आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या काळाप्रमाणे पाणी, पथदिवे, सफाई अशा सुविधा महापालिकेकडून तत्परतेने पुरवल्या जात नाही. लोकसंख्या वाढत आहे. मात्र, अद्यापही विकास आराखडा मंजूर केला नाही. तातडीने विकास आराखडा मंजूर करून रस्ते व इतर कामे सुरू करावी.
गोकुळ करंजावणे (माजी सरपंच, किरकटवाडी) : गावातील पाणी, रस्ते, कचरा आदी समस्या वाढल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे बंद आहेत. अनेक विभाग असल्याने मूलभूत सुविधा वेळेवर मिळत नाहीत. प्रशासनाने विकासाला गती द्यावी. महापालिकेने समाविष्ट गावांच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग करावा.

सागर कोल्हे (अध्यक्ष, समता परिषद कोल्हेवाडी-खडकवासला) : कोल्हेवाडी येथील रस्ता वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. रस्त्याअभावी नागरिक हैराण झाले आहेत. पाणी, तसेच स्वच्छता यंत्रणा कोलमडली आहे. महापालिकेत समावेश होऊनही या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. आशा बेनकर ( माजी सरपंच, धायरी) : स्वतंत्र नगरपालिकेला विरोध आहे. महापालिकेने विकासकामे सुरू केली आहेत. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. असे असले तरी सर्व भागांत पुरेसे पाणी व रस्ते अशा सुविधा आवश्यक आहेत.

किशोर रायकर (अध्यक्ष, खडकवासला विधानसभा काँग्रेस) : या गावांतून महापालिका कोट्यवधी रुपयांचा कर जमा करीत आहे. मात्र, दुसरीकडे गावातील विकासकामे ठप्प पडली आहेत. ग्रामपंचायतीच्या करापेक्षा तीन पट महापालिका घेत आहे. त्या प्रमाणात विकासकामे होत नाहीत. कचरा अनेक दिवस पडून राहत आहे. संदीप चव्हाण (माजी उपसरपंच, धायरी) : धायरी येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पाणीटंचाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. रमेश करंजावणे (उपाध्यक्ष, खडकवासला मनसे) : किरकटवाडी परिसरात अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. कचरा, पाणी आदी प्रश्न गंभीर झाले आहेत. गलथान कारभारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत,

नांदेडला हवे स्वतंत्र प्राधिकरण
देशातील नामांकित नांदेड सिटी गृहप्रकल्प असलेल्या नांदेड येथील सर्वपक्षीय नेते, नागरिकांचा मात्र महापालिकेला विरोध आहे. मात्र, फुरसुंगीप्रमाणे स्वतंत्र नगरपालिका न करता नांदेड प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

अ‍ॅड. नरसिंह लगड (संचालक, नांदेड सिटी) : महापालिका देत असलेल्या सुविधा पूर्वी ग्रामपंचायत देत होती. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केल्यास अधिक गतिमान विकास होईल.

रूपेश घुले पाटील (माजी उपसरपंच, नांदेड) : ग्रामपंचायत काळात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात होत्या. यंत्रणा बदलली, मात्र परिस्थिती बदलली नाही. उलट वेगवेगळ्या विभागांकडे वीज, पाणी, कचरा आदी समस्येसाठी याचना करावी लागत आहे. स्वतंत्र नगरपालिका किंवा प्राधिकरण केल्यास विकसित शहर अशी नांदेडची ओळख जगभरात होणार आहे.

उमेश कारले (संचालक, नांदेड सिटी) : मतभेद विसरून गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अल्प कालावधीत भरीव विकासकामे राबविण्यात आली. गावच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रात नांदेड सिटी प्रकल्प आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास स्वतंत्र प्राधिकरण सक्षम ठरणार आहे. त्यामुळे शासनाने दूरदृष्टीने स्वतंत्र प्राधिकरणास मंजुरी द्यावी.

ज्या उद्देशाने आम्ही 34 गावांचा पालिकेत समावेश करण्यासाठी न्यायालयीन लढा दिला. त्या उद्देशाकडेच पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गावातील समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहेत. लोकसंख्या वाढत आहे, महापालिका केवळ विकासाच्या घोषणा करीत आहेत. प्रत्यक्षात या गावात बकालीकरण वाढले आहे. अधिक वाट न पाहता प्रशासनाने नव्याने समाविष्ट गावांच्या विकासाला चालना द्यावी. भरमसाट कर कमी करावे.
                                                                -श्रीरंग चव्हाण पाटील,
                                               अध्यक्ष, हवेली तालुका नागरी कृती समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news