

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्नेहाचे नाते वृद्धिंगत करत आणि एकमेकांना 'तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणत रविवारी (दि.14) मकर संक्रांत घराघरांत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. वर्षातील पहिला सण असल्यामुळे यानिमित्ताने सगळीकडे चैतन्याची लहर असून, मंदिरांमध्येही फुलांची सजावट अन् विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
भाविकांना दिवसभर मंदिरांत दर्शन घेता येणार आहे आणि यानिमित्ताने मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
संक्रांतीनिमित्त विधीवत पूजाअर्चा करण्यासह घराघरांत पंचपक्वानांचा बेतही आखण्यात आला असून, सहकुटुंब एकत्रित येऊन या वर्षातला पहिला सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त शनिवारी (दि.13) बाजारेपठांमध्ये खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली.
वर्षातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. या महत्त्वपूर्ण सणाला तिळगूळ देऊन एकमेकांना शुभेच्छा देतात अन् स्नेहाचे, आपुलकीचे बंध जोडतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीनिमित्त घराघरांत चैतन्य दिसून येत आहे. घराघरांत रविवारी पारंपरिक वेशभूषा करून पूजाअर्चा करण्यात येणार असून, तिळाची वडी, तिळाचे लाडू, साखर आणि गुळाच्या वड्या देऊन नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तर महिला-युवतींकडून सायंकाळी हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर लहान मुलांचे बोरन्हाणही होणार आहे.
शनिवारी पूजेच्या साहित्यांसह हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमासाठी वाण, लहान मुलांच्या बोरन्हाणसाठीचे साहित्य, हलव्याचे दागिने अन् महिला-युवतींनी काळ्या रंगाच्या साड्या खरेदी केल्या. तिळगूळ आणि मिठाई खरेदीसाठीही दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. रविवार पेठेत संक्रांतीनिमित्त पतंग खरेदी करतानाही तरुण आणि लहान मुलांची लगबग दिसून आली. मकर संक्रांतीचा उत्साह शनिवारीही पाहायला मिळाला अन् घराघरांत जोमाने तयारीही दिसून आली.
चैतन्य नांदण्याची कामना
शनिवारी (दि.13) भोगीचा सणही साजरा झाला. घराघरांत पारंपरिकरित्या पूजाअर्चा करण्यात आली. तसेच, खास भोगीसाठी सर्व भाज्या एकत्रित करून तयार करण्यात येणार्या भाजीसह इतरही पदार्थ महिला-युवतींनी तयार केले. सहकुटुंब एकत्रितपणे त्याचा आस्वाद घेण्यात आला. भोगीनिमित्त घराघरांत चैतन्य अन् आनंद पाहायला मिळाला. मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली अन् भाविकांनी देव-देवतांचे दर्शन घेत सुख-समृद्धी अन् चैतन्य नांदण्याची कामना केली.