Pune : वाहतूक कोंडीवर क्षेत्रनिहाय आराखड्याचा उतारा

Pune : वाहतूक कोंडीवर क्षेत्रनिहाय आराखड्याचा उतारा

पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या वाहतुकीच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी महापालिका क्षेत्रनिहाय वाहतूक आराखडा तयार करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तीन भागांचा वाहतूक आराखडा तयार करून त्या माध्यमातून वाहतुकीसह रस्त्यांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. शहरीकरणाचा वेग जसा वाढतो तशी वाहनांची संख्याही वाढत आहे. शहराची लोकसंख्या जेवढी आहे, तेवढीच वाहनांची संख्या आहे. शहरात साधारण 45 लाख 86 हजार 960 वाहने रस्त्यावर धावतात. या वाहनांसाठी प्रशासनाकडून मुख्य शहरासह उपनगरांमध्ये नवीन रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, रस्ते रुंदीकरण अशी कामे केली जातात.

संबंधित बातम्या :

महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी नवीन रस्ते आणि प्रकल्पाचे नियोजन करण्यात येते. मात्र, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने जुनी हद्दीचा डीपी (विकास आराखडा) आणि समाविष्ट गावांचा आरपी (प्रादेशिक विकास आराखडा) डोळ्यासमोर ठेवून पाहणी करून रस्त्यांचा अभ्यास केला. यामध्ये 390 लिंक (ठिकाणे) मधील 273.22 कि.मी. रस्ते मिसिंग असल्याचे समोर आले. मिसिंग रस्त्यामध्ये 2-3 किलोमीटरपासून 100, 200 मीटर लांबीच्या अंतराचा समावेश आहे. या मिसिंग लिंक जोडण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भूसंपादनाला हवा तसा वेग मिळत नाही. यानंतर आता महापालिकेने क्षेत्रनिहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये त्या भागातील अस्तित्वात असलेल्या व डीपीमध्ये असलेल्या रस्त्यांसह वाहतुकीचा अभ्यास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन भाग निवडण्यात आले असून, त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

क्षेत्रीय आराखड्यात कोणता अभ्यास होणार?
रस्त्याच्या कडेला होणारी पार्किंग व पथारी व्यावसायिक, पदपथावरील अतिक्रमणे.
डीपीनुसार रस्ते तयार झाले आहेत का ? वाहतूक व्यवस्थित आहे का ?
डीपीनुसार रस्ते झाले नसल्यास त्याची सद्य:स्थिती काय ?
कोणत्या रस्त्याचे कुठे रुंदीकरण गरणे गरजेचे आहे ?
वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन
उपाययोजना काय करता येतील ?
कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटरची गरज आहे ?

ज्या परिसराच्या विकासाची प्रक्रिया सुरू आहे, नागरी वस्ती वाढत आहे. त्या परिसराकडे जाणार्‍या रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी क्षेत्रनिहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात तीन रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे.
                         – निखिल मिजार, वाहतूक व्यवस्थापक, पथ विभाग, महापालिका.

पहिल्या टप्प्यात तीन भाग
व रस्त्याचा होणार आराखडा
कोरेगाव पार्क (नॉर्थ मेन रोड), मुंढवा, केशवनगर
खडी मशिन चौक, कोंढवा,
एनआयबीएम रस्ता, मोहंमदवाडी
हडपसर गाडीतळ, ससाणेनगर, हांडेवाडी रस्ता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news