वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : लागोपाठ सहा दिवस धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सोमवारी (दि.2) पावसाने उघडीप घेतली. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरण साखळीत 28.40 टीएमसी म्हणजे 97.46 टक्के साठा झाला होता. पावसाने उघडीप घेतली असली, तरी पडलेल्या दमदार पावसामुळे डोंगर, ओढे-नाल्यांचे प्रवाह सुरू असल्याने टेमघर वगळता इतर तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, की मुसळधार पावसामुळे धरण साखळीतील पाण्याची तूट भरून निघाली आहे.
शेतीसाठी खरीप आवर्तन सुरू आहे. त्याची तूट भरून साखळीत क्षमतेइतके पाणी आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्यासह शेतीला लाभ होणार आहे. सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरण क्षेत्रांत पावसाची नोंद झाली नाही. रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरपट्ट्यात तुरळक शिडकावा झाला. जादा पाणी सोडूनही वरसगाव, पानशेत व खडकवासला धरणांतील पाण्याची पातळी शंभर टक्क्यांवर कायम आहे. पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता वरसगाव व खडकवासलातील विसर्ग कमी करण्यात आला. सध्या खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात 1712 व वरसगावमधून वीज निर्मिती सांडव्यातून 600 क्सुसेकने विसर्ग सुरू आहे.
धरणांतील साठा टीएमसीत कंसात टक्केवारी
टेमघर 2.97( 80.03) वरसगाव 12.82 ( 100) पानशेत 10.65 ( 100) खडकवासला 1.97 (100)
हेही वाचा :