मोठी बातमी! परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अटक

मोठी बातमी! परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अटक
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्यात,  हडपसर पोलिसांनी अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर  राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण-सूस रोड) यांना सोमवारी अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून दराडे यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना चौकशीसाठी हडपसर पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे.  दोघांवर  हडपसर पोलिस ठाण्यात संगनमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी (वय 50, रा. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक असून, शैलजा उत्तम खाडे (पूर्वाश्रमीच्या शैलजा रामचंद्र दराडे) या राज्य शिक्षण परिषदेच्या आयुक्त आहेत. तर, दादासाहेब दराडे हा त्यांचा भाऊ आहे. दादासाहेब दराडे याने शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 लाख व 15 लाख रुपये असे 27 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन वारंवार पाठपुरावा करूनदेखील त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करून त्यांचे पैसे परत केले नाहीत. अशाच प्रकारे  44 जणांचा विश्वास संपादन करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला होता.  आता याच प्रकरणात शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दराडे यांनी गुन्हा दाखल झाल्याबाबत  समजल्यानंतर आपला आणि  दादासाहेब याच्याशी काही संबंध नाही. त्याच्याबरोर संबंध तोडलेले असून, त्याच्याशी कोणीही व्यवहार करू नये, असे जाहीर प्रकटन ऑगस्ट 2020 केल्याचे शैलजा दराडे यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांना याच प्रकरणात अटक झाली आहे.

कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह

डी.एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख, तर बी. एड. झालेल्यांकडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत असल्याचा आरोप होता. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी 7 जुलै 2023 रोजी राज्य सरकारला याबाबत सविस्तर अहवाल सादर केला. त्यामध्ये शैलजा दराडे यांनी केलेली कृती त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे नमूद केले होते. त्याची दखल घेत उपसचिव टी. व्ही. करपते यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.
गुन्ह्यात चौकशीअंती शैलजा दराडे यांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्यांच्या भावाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
– रवींद्र शेळके,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news