

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : रायतेमळा (सणसर) येथे निरा डावा कालवा पुन्हा एकदा फुटल्याने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदाच्या प्रशासनाला खडे बोल सुनावले व ताबडतोब शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.
आ. दत्तात्रय भरणे शुक्रवारी (दि. 7) पाच वाजेच्या सुमारास रायते मळा येथे निरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी पोहोचले. या कालव्याला गेल्या महिन्यात भगदाड पडून सणसर भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.
या घटनेला महिना उलटत नाही, तोच पुन्हा एकदा याच ठिकाणी कालवा फुटल्याने आ. भरणे येथे आल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले व शेतकर्यांनी जलसंपदा विभागाच्या कारभाराविषयी नारजी व्यक्त केली. आ. भरणे यांनी सणसर परिसरामध्ये नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून जलसंपदाच्या प्रशासनाला खडे बोल सुनावले.
या पाहणी दरम्यान उपस्थित शेतकर्यांनी आमदार भरणे यांना सांगितले की, मागील पाच-सहा दिवसांपासून कालव्याला गळती लागली होती. याविषयी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी सातत्याने संपर्क साधत गळती होत असलेल्या ठिकाणची तातडीची दुरुस्ती करण्याबाबत सूचविले होते; परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने आज पुन्हा एकदा कालवा फुटला. हे सांगताच आमदार भरणे यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धोडपकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना खडसावले.
आमदार भरणे म्हणाले की, गेल्याच महिन्यात या ठिकाणी कालवा फुटल्याने शेतकर्यांचे शेतीचे, संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची मदत अद्यापपर्यंत शेतकर्यांना मिळाली तर नाहीच; परंतु जलसंपदा विभागाच्या कारभारामुळे आज पुन्हा एकदा शेतकरीबांधवांचे नुकसान झाले आहे. आ. भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाचे ताबडतोब पंचनामे करून शेतकर्यांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत मिळाली पाहिजे, असे संबंधित अधिकार्यांना सुनावले.