पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे वैभव असलेल्या शहरातील टेकड्यांवर राजकीय लोकांमुळे झोपड्या तयार होतात. परिणामी, शहराला बकालपणा येतो. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत न बसणार्या आणि टेकड्यांवर अतिक्रमण करून झोपड्या टाकणार्यांचा मतदानाचा अधिकार काढला तर सगळं सरळ होईल, असे परखड मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच पुण्याच्या पर्यावरणावर परिणाम करणार्या प्रकल्पांना पुणेकरांनी पुढे येऊन ठामपणे विरोध करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. श्रीकांत गबाले आणि मंजुश्री पारसनीसलिखित 'आंबील ओढा' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, डॉ. श्रीकांत कार्लेकर, तुषार शितोळे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शहरात बाहेरून नोकरी, व्यवसायासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे एकाने टेकडीवर झोपडी टाकली की, तेथे अन्य झोपड्या येतात. राजकीय व्यक्ती मतांच्या स्वार्थापोटी बेकायदा झोपडपट्टी वाढण्यास कारणीभूत ठरतात. त्यामध्ये काही संघटना येतात. त्यामुळे शहराला बकालपणा येतो. कायदाच्या चौकटीत बसणार नाही. मात्र, अतिक्रमण करणार्यांचा मताचा अधिकार काढल्यास सगळे सरळ होतील.
डॉ. खेमनार म्हणाले, आंबील ओढा हा नाला, ओढा नाही तर उपनदी आहे. आंबील ओढ्याला 2019 मध्ये पूर आल्यानंतर अनेक कामे केली आहेत. यापुढेही कामे केली जाणार आहेत. यावर तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी व शास्त्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
स्मार्ट सिटी नावाखाली चुकीची कामे झाली. या कामांमुळे जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचू लागले आहे. हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक इशारा आहे. आपल्याला सगळे समजते, हे राज्यकर्ते आणि अधिकार्यांनी समजू नये, सरकार कोणाचेही असो, तज्ज्ञांची मते विचारात घेऊनच कामे करणे गरजेचे आहे. तसेच नुकसान होणार असेल, तर जनतेने पुढे येऊन आवाज उठविला पाहिजे. जनतेच्या रेट्यापुढे कोणाचेही चालत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
त्या-त्या वेळच्या राज्यकत्र्यांना अधिकार्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे किंवा राज्यकर्त्यांनी अधिकार्यांचा सल्ला न ऐकल्यामुळे पुण्यातील प्रकल्प चुकले. विद्यापीठ चौकातील पाडलेला उड्डाणपूल आणि हडपसर येथील पूल ही त्याची उदाहरणे आहेत. चुकीच्या कामाचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो. त्यामुळे पुणेकरांच्या सहनशिलतेला सलाम करायला हवा. प्रकल्प अपुरा असताना उद्घाटन केल्याने मेट्रोचा वापर होत नाही. पर्यावरणावर परिणाम करणारे प्रकल्प आम्ही बंद केले होते. मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर ते प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी या वेळी नमूद केले.