वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जगात जागतिक तापमान वाढ व पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत असताना आणि पर्यावरणाने भरभरून दिले असतानाही माणूस वसुंधरेचे शोषण करीत आहे. जन्म झाल्यापासून माणसाला निसर्गापासून प्राणवायू मिळतो. जीवन या शब्दातच वन समाविष्ट आहे. माणसाला जगविण्याची क्षमता निसर्गात असल्याने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक असल्याची अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केली.

राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्ती व संस्थांना रविवारी (दि.26) यशदा येथे झालेल्या कार्यक्रमात 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार'च्या 2018 व 2019 या वर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनिता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विवेक खांडेकर, वन अकादमी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी आदी उपस्थित होते.

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वर्ष साजरे करत असताना आणि त्यांच्या विचारांचा जयघोष करतानाच आपण एक पाऊल कृतीच्या मार्गावर पुढे न्यायचे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण एकटे विश्वाचे पर्यावरण बदलू शकत नसलो तरी त्यासाठी आपला वाटा, योगदान देऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून वृक्ष लावण्याची विचारगंगा लोकांपर्यंत जावी, वृक्ष तोडणारे हात कमी होऊन वृक्ष लावणारे हात वाढावेत, वृक्ष संवर्धन संस्कृती वाढण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राज्यातील 33 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अनुषंगाने जलसंधारण, पर्यावरण रक्षण आदी कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक व्हर्चुअल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात या विषयाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये, द्वितीय 75 हजार रुपये, तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन 2018
संवर्ग 1- व्यक्ती : प्रथम पुरस्कार- रघुनाथ मारुती ढोले, घोरपडी, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुधाकर गुणवंतराव देशमुख, मु. ममदापूर, पो. पाटोदा, ता. अंबाजोगाई, जि. बीड, तृतीय पुरस्कार- रोहित शंकर बनसोडे, गोंदवले खुर्द, ता. माण (जि. सातारा)
संवर्ग 2- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार- म. वि.प. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव (जि. नाशिक), द्वितीय पुरस्कार- एस.एम. इंग्लिश स्कूल, वाशिम, तृतीय पुरस्कार-शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड (जि. औरंगाबाद)
संवर्ग 3- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- आधार फाऊंडेशन, मु.पो.रुकडी, ता. हातकणंगले (जि. कोल्हापूर), द्वितीय पुरस्कार- मराठवाडा जनविकास संघ, पिंपळे गुरव, पुणे – 27, तृतीय पुरस्कार- श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव (जि. जळगाव).
संवर्ग 4- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. बिदाल, ता. माण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- ग्रामपंचायत पुणतांबा- रस्तापूर, ता. राहता, (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. चिंचणी, ता. पंढरपूर (जि. सोलापूर)
संवर्ग 5- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार- जिल्हा परिषद कोल्हापूर, द्वितीय पुरस्कार- पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन 2019 :
संवर्ग 1- व्यक्ती: प्रथम पुरस्कार- किसन धोंडीबा गारगोटे, पंचवटी, पाषाण रोड, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुशांत प्रकाश घोडके, समर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलनी, साईनगर, मु.पो. ता. कोपरगांव (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- सुनिल रामदास वाणी, श्रीकृष्ण कॉलनी, जळगाव.
संवर्ग 2- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार-मुधोजी महाविद्यालय, फलटण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड (जि. नाशिक), तृतीय पुरस्कार- स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे, ता. कराड (जि. सातारा).
संवर्ग 3- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत गमेवाडी, ता. कराड (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार-ग्रामपंचायत साबुर्डी, ता. खेड (जि. पुणे), तृतीय पुरस्कार-ग्रामपंचायत लोहसर, पाथर्डी (जि. अहमदनगर).
संवर्ग 4- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- ज्ञानशक्ती विकास वाहिनी, मंचर, ता.आंबेगाव (जि.पुणे), द्वितीय पुरस्कार-शिवराज मित्र मंडळ, भैरवनगर, धानोरी रोड,पुणे-15, तृतीय पुरस्कार- वसुंधरा अभियान, बाणेर, पुणे 411045.
संवर्ग 5- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार-वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, द्वितीय पुरस्कार-पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news