

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पंचायत आमच्याच ताब्यात आली आहे, सरपंच आमचा झाला आहे, जास्तीत जास्त जागा, पंचायती आम्हीच जिंकल्या, हे सांगण्याची स्पर्धाच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत तालुक्यातालुक्यांत सुरू झाली आहे. निवडून आलेल्या सरपंचांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांच्यापैकी काही गावकीच्या राजकारणात मुरलेले; मात्र दोन्ही पक्षांचे सत्कार स्वीकारत आम्ही तुमचेच, असे सांगत या पक्षांची गंमत बघत आहेत.
सकाळी इकडे तर दुपारी तिकडे, अशी त्यांची चाल असल्याने नेतेही गोंधळलेत. त्यांनाही नक्की काय चालले आहे, ते समजेना. अजून एकाही सरपंचाने पुढे येत मी या पक्षाचा, असे छातीठोकपणे सांगितलेले नाही. बहुतेक गावांत संमिश्र पॅनेल होते. गावकी-भावकीच्या राजकारणात ज्यांचे सूर जुळले त्यांनी स्थानिक जुळवाजुळव करीत पॅनेल केलेले.
त्यात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस असे सर्व एकत्र; पण आता तालुक्याचे सर्वपक्षीय नेते म्हणताहेत तो आमचाच. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. राज्यात सत्ता असल्याने भाजपवाल्यांना 'आम्ही तुमचेच' असे म्हणावे, तर दौंड वगळता इतर तालुक्यांत आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे असल्याने ते डोळे वटारताहेत, अशी 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी त्यांची स्थिती झाली आहे. दोन्ही बाजूंकडून बघू, कामे कशी करताय? असा दम भरला जात आहे.
तालुका, जिल्हापातळीवर मात्र भाजप, राष्ट्रवादीची नेतेमंडळी जोरदारपणे आमचीच संख्या जास्त असल्याचा दावा करीत आहेत. सरपंच आणि सदस्य मात्र दोन्हीकडे पाहुणचार झोडत हार, तुरे स्वीकारत फिरत आहेत. काही महत्त्वाच्या नेत्यांच्या तालुक्यात तर जोरदार घमासान रंगले आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सध्या जोरदार राजकारण सुरू आहे.
भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर समोरासमोर आहेत; परंतु ठाकरे सेना आणि शिंदे सेनेचीही जोरात लढत सुरू असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपले वर्चस्व दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न जोरात सुरू आहे. या सगळ्या राजकारणाच्या गदारोळात नवीन ग्रामपंचायत सदस्य आणि थेट जनतेतून निवडले गेलेले सरपंच मात्र गोंधळून गेले आहेत. या सर्व गोंधळाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी काही सरपंच आणि सदस्य थेट पर्यटनाला निघून गेले आहेत.