मी आमदार भरणे मामांच्या तालमीतलाच पठ्ठ्या : कुशाबा भिसे

मी आमदार भरणे मामांच्या तालमीतलाच पठ्ठ्या : कुशाबा भिसे

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  'मी पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचा असून, सध्याही मी राष्ट्रवादीतच आहे. शेवटी मी आमदार भरणे मामांच्या तालमीतलाच पठ्ठ्या आहे,' या शब्दांत लाकडी (ता. इंदापूर) येथील नूतन सरपंच कुशाबा रामा भिसे यांनी तालुक्यातील उलटसुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भरणेवाडी येथे रविवारी (दि. 12) लाकडी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांनी सत्कार केला. या वेळी पत्रकारांशी बोलताना सरपंच भिसे म्हणाले, आ. भरणे यांच्या सूचनेनुसार आम्ही गावपातळीवर बसून बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व सदस्यांच्या निवडीही बिनविरोध झाल्या. मात्र, स्थानिकपातळीवर मतभेद झाल्याने सरपंचपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये मतदारांनी मला सरपंचपदाची संधी दिली.

दरम्यान, स्थानिक विचारविनिमय होण्यास विलंब झाल्याने आमदार भरणे यांनी शुक्रवारी (दि. 10) आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उपस्थित राहू शकलो नव्हतो. आज सर्व गावकर्‍यांना सोबत घेऊनच आपण आ. भरणे यांच्या भेटीस आलो असून, आम्ही कायमच त्यांच्या पाठीशी आहोत. आजवर भरणे यांनीच आमच्या गावचा विकास केला असून, आमच्या गावकर्‍यांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. यापुढील काळातही आपण उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार भरणे यांच्या माध्यमातून गावचा विकास साधणार आहे. या वेळी आमदार भरणे यांनी नूतन सरपंच कुशाबा भिसे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोंडीबा वणवे, माऊली महादेव वणवे, महादेव अगंध वणवे यांच्यासह भास्कर वणवे, नारायण वणवे, अरुण वणवे, प्रवीण अगवणे यांचा सत्कार केला. या वेळी लाकडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news