‘पोर्शे’ प्रकरणानंतरही वाकड पोलिस धडा घेईना

‘पोर्शे’ प्रकरणानंतरही वाकड पोलिस धडा घेईना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात एका बिल्डर पुत्राने पोर्शे या अलिशान कारखाली दोघांना चिरडून ठार मारले. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले असून, अनेकांच्या हे प्रकरण अंगलट आले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 28) रात्री थेरगाव येथे भरधाव वेगात कार चालवून एका अल्पवयीन मुलाने घरासमोर पार्क केलेल्या कारला धडक दिली. घराच्या गेटला धडक बसल्याने कार थांबली.

नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, काहीही कारवाई न करता मुलाला सोडून दिले. माध्यमांनी राळ उठवल्यानंतर पोलिसांनी तब्बल दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे 'पोर्शे' प्रकरणानंतरही वाकड पोलिस धडा घेत नसल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी दीपक लक्ष्मण दवणे (43, रा. थेरगाव) यांनी गुरुवारी (दि. 30) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अल्पवयीन मुलाच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांची कार त्यांच्या घरासमोर पार्क करण्यात आली होती. त्या वेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव चालवून त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दीपक यांच्या कारसह मुलाच्या ताब्यात असलेल्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. तपास वाकड पोलिस करत आहेत.

कारमालकावर गुन्हा?

कार चालवत असलेल्या आरोपी मुलाचा 28 मे रोजीच अठरावा वाढदिवस होता. त्यामुळे आरोपीच्या वयाबाबत पोलिसही संभ्रमित होते. पोलिसांनी आरोपी मुलाचे आधारकार्ड, जन्म दाखला यासह कागदपत्रांची पडताळणी करून खातरजमा केली. दरम्यान, मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. कारमालकाने त्याच्या ताब्यात कार दिली. त्यामुळे या कारमालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मोठी घटना टळली

कारचालकाने भरधाव कारने रस्त्यावर पार्क केलेल्या कारला धडक दिली. त्यानंतर कार घराच्या गेटला जाऊन धडकली. दररोज त्या ठिकाणी नागरिक गप्पा मारत बसतात. तसेच, काही वृद्ध मंडळी शतपावलीसाठी रस्त्यावरुन जात असतात. मात्र, सुदैवाने अपघात घडला, त्या वेळी तेथे कोणीही नव्हते. अपघात इतका भीषण होता की, कारच्या दोन्ही इअर बॅग उघडल्या होत्या.

प्रकरण मिटवण्यासाठी भरपाईचे आमिष

अपघात झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून कारमालकाने फिर्यादी यांना भरपाई देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी अनेकांनी मध्यस्थीदेखील केली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू होता.

…म्हणे तक्रार दिली नाही!

थेरगाव येथे अपघात झाल्यानंतर आरोपी मुलासह फिर्यादी यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. अपघातात कोणीही जखमी किंवा कोणाचा मृत्यू झाला नसल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. तसेच, अल्पवयीन मुलगा चालवत असलेली कार एका कार्यकर्त्याची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आपसात मिटवून घ्या, असा सल्ला दिला. त्यामुळे या प्रकरणाची पोलिस ठाण्यात कसलीही नोंद नव्हती. याबाबत माध्यमांवर अपघाताचे व्हिडीओ आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कोणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल केला नाही, असे सांगून हात वर केले.

'त्या' पोलिसांवर कारवाई होणार का?

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर गस्तीवरील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कारचालक मुलगा आणि फिर्यादी यांना पोलिस ठाण्यात आणले. मात्र, ड्युटीवरील पोलिसांनी कोणतीही कारवाई अथवा नोंद न घेता दोघानांही पाठवून दिले. त्यानंतर फिर्यादी दुसर्‍या दिवशीदेखील दिवसभर ठाण्यात बसून होते. त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news