शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही योजनेचे काम कासवगतीनेच सुरू आहे. आठ वर्षांनंतरही अद्याप पाणीसाठवण टाक्यांचा प्रश्न सुटलेला नाही. कामाची मुदत जूनमध्ये संपल्यानंतर पुन्हा एकदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या मुदतीमध्ये तरी काम पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी 40 टक्के गळती थांबवण्यासाठी आणि पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील 30 वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेसाठी अंदाजे दोन हजार 818 कोटी 46 लाख रुपये खर्च ग्रहीत धरण्यात आला असून, त्याला महापालिकेच्या मुख्य सभेने मे 2015 मध्ये मंजुरी दिली आहे.
या योजनेसाठी सल्लागार नेमून, प्रकल्प आराखडा तयार करून 2017 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी 82 पाणीसाठवण टाक्या, 1550 कि.मी. लांबीच्या लाहन-मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या, 120 कि.मी. लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या आणि तीन लाख 18 हजार 847 पाणी मीटर बसवणे, आदी कामे केली जाणार आहेत. हे काम 36 महिन्यांत पूर्ण करण्याचे निविदेमध्ये नमूद केले होते.
मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीमध्ये योजनेचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे आजवर तीन वेळा प्रत्येकी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. कामाची शेवटची मुदत जूनमध्ये संपली. त्यानंतरही अद्याप कामे पूर्ण होऊ न शकल्याने प्रशासनाने आता पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र, सध्याचा कामाचा वेग विचारात घेता, या मुदतीतही योजनेची कामे पूर्ण होतील का, याबाबत अनिश्चितताच आहे. दरम्यान, आत्तापर्यंत पाण्याच्या टाक्यांच्या खर्चासह 1368.44 कोटी रुपये निधी खर्च झाला आहे.
योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसवली जात आहेत. मीटर बसवल्यानंतर पाण्याची चोरी पकडली जाणार, जास्त पाणी बिल येणार, या भीतीने मीटर बसविण्यास नागरिकांकडून व राजकीय नेत्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे योजनेतील इतर कामांच्या तुलनेत पाणी मीटर बसविण्याचे काम अपेक्षित उद्दिष्ट गाठू शकले नाही.
एकूण काम - 1550 कि.मी.
काम पूर्ण - 950.57 कि.मी.
टाक्यांना पाणीपुरवठा
करणार्या जलवाहिन्या
एकूण काम - 120 कि.मी.
काम पूर्ण - 87.263 कि.मी.
एकूण मीटर - तीन लाख 18 हजार 847
काम पूर्ण - एक लाख 64 हजार 287
पाणीसाठवण टाक्या
एकूण साठवण टाक्या - 82
काम पूर्ण झालेल्या टाक्या - 60
वितरण व्यवस्थेत समावेश - 20
कामे प्रगतिपथावर - 08
दोन टाक्यांसाठी जागांचा शोध सुरू आहे.
उर्वरित 12 टाक्यांसाठी स्वतंत्र निविदा
दोन टाक्यांच्या निविदांसाठी कार्यादेश