

पाहणाऱ्याला वाटते माणूस पुढे चाललाय, पण प्रत्यक्षात मात्र तो मागे मागेच जात राहवा, अशीच काहीशी अवस्था पीएमपीची झाली आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्या ५०० बस येणार, असे ढोल पिटले जात असताना वर्षभरात भंगारात काढलेल्या बस वजा जाता, पूर्वीचीच २ हजार एवढीच बससंख्या ताफ्यात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे दीड हजार बसेसची तूट पुणेकरांना यापुढेही सहन करावी लागणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी, पुणेकर प्रवाशांचे प्रवासासाठी हाल होत आहेत. बससाठी तासनतास थांब्यावर वेटिंग करावे लागत आहे. तसेच, बस मिळाली तर गर्दीत बसावे लागत आहे. गाडीच्या दरवाजात लटकून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपीसह दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाने ताफ्यातील बस गाड्या वाढविण्या साठी हातभार लावणे गरजेचे झाले आहे.
केंद्राच्या महुआच्या गाईड लाइननुसार १ लाख लोकसंख्येला ५० बस आवश्यक असतात. मात्र, आयटीडीपीच्या अहवालानुसार पुणे शहराची लोकसंख्या ४८.७५ लाख आहे. पिंपरी-चिंचवडची ३४.६० लाख, पीएमआरडीएची १५.३१ लाख, अशी एकूण ९८.६६ लाख लोकसंख्या आहे. यानुसार पीएमपीच्या ताफ्यात किमान ४ हजार ९०० बस असणे आवश्यक आहे. परंतु, पीएमपीच्या ताफ्यात त्या तुलनेने खूपच कमी बस आहेत. त्यामुळे पुणेकर, पिंपरी-चिंचवडकर आणि पीएमआरडीए भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत.'
पीएमपीच्या ताफ्यात १२ वर्षांपुढील १५२ बस आहेत. ११ ते १२ वर्षांदरम्यानच्या १७३ बस आहेत. तसेच, ६ ते ९ वर्षे कालावधीतील १९३ बस आहेत आणि ५ वर्षांच्या आतील ४८८ बस आहेत. यावरून जवळपास ३२५ बस आगामी काळात ताफ्यातून भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त नव्या बस ताफ्यात दाखल कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.