

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नाटक हे नाटक म्हणून पाहिले पाहिजे. सुरुवातीच्या काळात घाशीराम कोतवाल नाटक करताना विरोध झालाच. पण, विरोध हा जीवनाचा भाग आहे, आम्हाला कधी भीती वाटली नाही आणि आम्ही कधी घाबरणारही नाही. आम्ही रंगकर्मी आहोत, आम्ही आमचे काम करीत आहोत. टीका करणार्यांनी त्यांनी त्यांचे काम करावे. विरोधाला सामोरे जात घाशीराम कोतवाल नाटक केले आणि आताही करीत आहोत, अशा शब्दांत घाशीराम कोतवाल या नाटकात नाना फडणीस यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ रंगकर्मी माधव अभ्यंकर यांनी भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या आणि त्यावेळी वादग्रस्त ठरलेल्या पण आता एक अस्सल कलाकृती म्हणून नावाजल्या गेलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाला शुक्रवारी (दि.16) 50 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच या नाटकात महत्त्वपूर्ण काम करणार्या ज्येष्ठ रंगकर्मी माधव अभ्यंकर यांच्या कारर्किदीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अभ्यंकर यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी घाशीराम कोतवाल नाटकातील आठवणींना उजाळा दिला अन् घाशीराम कोतवाल नाटकाला सुरुवातीच्या काळात झालेल्या विरोधाबद्दल त्यांनी सांगितले.
एक अभिनेता म्हणून वाट्याला भूमिका आलेली योग्यरित्या करायची हे मूल्य नेहमीच जपले. मी नाटकात केलेली नाना फडणीस यांची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली. आतापर्यंत लवकरच प्रयोगांचे 1300 चा पल्ला गाठणार आहोत. एवढ्या प्रयोगांमध्ये अनेक दिग्गजांनी हे नाटक पाहिले अन् कौतुकही केले. या नाटकाने एक ओळख दिली अन् 30 वर्षांचा प्रवास खूप भारावून टाकणारा आहे, अशा आठवणीही त्यांनी सांगितल्या.
अभ्यंकर म्हणाले, या नाटकाविषयीच्या माझ्या मनात अनेक सुंदर आठवणी आहेत. मुळात हे एक राजकारणावर भाष्य करणारे नाटक आहे. ते आजच्या काळाशीही संबंधित असून, आजही त्याच पद्धतीचे राजकारण आपण बघतो. मला या नाटकांत काम करायचे आहे, हे मनाशी ठरविले होते. पण, मला वाटले नव्हते की, पुढे जाऊन मला हे नाटक करता येईल आणि ती संधी मला मिळाली.
ही संधी माझ्याकडे आली, मी नाटकाचे प्रयोग सुरू केले आणि आयतागायत मी नाटकाचे प्रयोग करतोय, करत आलोय. मी माझ्या पद्धतीने नाटकात नाना फडणीस यांची भूमिका साकारली आणि लोकांच्या पसंतीस उतरली. डॉ. मोहन आगाशे यांनी मला अभिनय करताना पाहिले, त्यावेळी त्यांनी कुठेही तू माझी नक्कल केली नाहीस, कॉपी केले नाही, तू तुझ्या पद्धतीने भूमिका केली ही दाद दिली होती.