बारामती : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला लोककलेचा उत्तुंग वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची लोककला आणि मराठमोठ्या लोककलेचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे, असे मत पंढरपूरच्या उत्पात लावणी मंडळाचे प्रमुख मनोहर उत्पात यांनी व्यक्त केले. येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने परिवर्तन व्याख्यानमालेत ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते या वेळी नटराजाचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला उत्पात यांनी गणेशवंदना, गणगवळण सादर केली. उत्पात लावणी मंडळ पंढरपूर व नंदा-उमा इस्लामपूरकर भगिनी यांनी विविध लावणी प्रकार सादर केले.
उत्पात म्हणाले, सन 1903 मध्ये उत्पात लावणी मंडळाची स्थापना झाली. ज्ञानोबा उत्पात आणि त्यांचे सहगायक दादबा उत्पात यांनी लावणी मंडळाचे रोप लावले. त्यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या काही लावण्या या वेळी मनोहर उत्पात यांनी गाऊन दाखवल्या. त्यांना रवींद्र वनारे, भोलानाथ भोसले, प्रमोद औंधकर यांनी साथ दिली. संस्थेकडून सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सिद्ध गणेश या लावणीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंदा इस्लामपूरकर यांनी गायलेल्या या लावणीवर उमा इस्लामपूरकर, ज्योती लाखे, सुनीता जावळे, दीपा लाखे यांनी लावणीचे सादरीकरण केले. कार्यक्रमात गणपतीवंदन, गणगवळण, मुजरा, बैठकीची लावणी, छक्कड, अदाकारी, ढोलकी आविष्कार आदी वेगवेगळे प्रकार सादर झाले. इतिहास विभागप्रमुख डॉ. डी. ए. मोरे यांनी लावणीचा इतिहास सांगितला. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलवडे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी, समन्वयक प्रशांत तनपुरे, मानव संसाधन व्यवस्थापक गार्गी दत्ता आदींची या वेळी उपस्थिती होती.