पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्रकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर व शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हे या समितीचे सदस्य असतील.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. वेरावळ गुजरात येथील सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी हे या समितीचे अन्य
सदस्य असतील.