

पुणे: महात्मा फुले वाडा स्मारकाचे भूसंपादन व सर्वेक्षण रखडले आहे. याप्रकरणी छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पालिका स्मारकाचे काम करण्यासाठी पालिकेने आता आता वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.
स्मारकासाठी भूसंपादन करण्यासाठी उपायुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे, तर भूसंपादन व सर्वेक्षण करण्यासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
राज्य शासनाच्या माध्यमातून पालिकेमार्फत महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सध्या पालिकेने स्मारकाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी उपायुक्त अविनाश सपकाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भूसंपादन करण्यासाठी एक समिती काम करणार आहे, तर स्मारक परिसरातील जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी दुसर्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी ही समिती लवकरच अर्ज तयार करणार आहे.
तर भूसंपदनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयालादेखील अर्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पृथ्वीराज यांनी दिली. स्मारकालगतचे जागामालक आणि भाडेकरू यांच्या विविध मागण्या आहेत. त्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार ? त्यांना मोबदला द्यावा की टीडीआर किंवा पर्यायी जागा द्यावी याबाबतदेखील ही समिती विचार करणार आहे.
जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन वास्तू एकत्रित जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, वाडा परिसरातील काही खासगी जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. या वास्तूंचे एकत्रीकरण व विस्तारासाठी 91 मिळकती बाधित होणार आहे. त्याचे क्षेत्रफळ पाच हजार 310 चौरस मीटर आहे. यामध्ये 251 मालक आणि 801 भाडेकरू आहेत. या सर्वांशी चर्चा करून त्यांच्या जागा ताब्यात घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
या समितीच्या स्थापनेमुळे स्मारक निर्मितीचा वेग वाढणार आहे. स्थानिक नागरिकांशी ही समिती चर्चा करणार आहे. तसेच सर्वेक्षणदेखील ही समिती करणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, महापालिका