मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी पक्षाच्या एका बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणार्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. या भूमिकेला पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता तपासे यांची पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.
महेश तपासे यांचे आजोबा माजी राज्यपाल गणपतराव तपासे यांनी आधीच पानिपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे सरकार बांधत असलेल्या स्मारकाला महेश तपासेंनी पाठिंबा दिला आणि पक्षातील नेत्यांची नाराजी ओढवून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा 15 दिवसांत प्रवक्तेपदाबाबत पक्षात दोन बैठका पार पडल्या. यानंतर नवे पदाधिकारी नेमण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार लवकरच निवड प्रक्रिया पार पडेल, असे राष्ट्रवादीतर्फे स्पष्ट करण्यात आले.