AI monitors traffic violators
पुणे: शहराच्या मध्यवर्ती फर्ग्युसन रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेशिस्त वाहन चालकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांत तब्बल तीन हजार 220 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यामध्ये डबल पार्किंग करणाऱ्या सर्वाधिक एक हजार 284 वाहनांचा समावेश आहे.
28 मे 2025 रोजी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. एआय प्रणालीवर आधारित ही यंत्रणा लागू केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच मोठ्या प्रमाणात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, नो पार्किंगमध्ये गाडी उभी करणे, डबल पार्किंग, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अशा नियमभंग प्रकारांवर स्वयंचलितपणे दंडात्मक कारवाई केली जाते. (Latest Pune News)
अत्याधुनिक एआय कॅमेरे रस्त्यावरील वाहनांची हालचाल सातत्याने टिपत असून, नियमभंग आढळल्यास मिनिटाभरातच त्या वाहनचालकांवर दंड आकारला जातो. या प्रणालीमुळे गाड्या कोणत्या ठिकाणी, किती वेळ उभ्या आहेत, पार्किंगचा नियम मोडला आहे का, हे सर्व तपशील यंत्रणेला त्वरित कळतात. त्यानुसार दोन महिन्यांत तब्बल तीन हजार 220 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
फर्ग्युसन रस्त्यावर वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर पार्किंग नियमांचे उल्लंघन केले जात होते. त्यामुळे स्थानिक नागरिक, दुकानदार तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, एआय प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर नियम मोडण्याचे प्रमाण घटल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पीटीपी ट्रॅफिकॉपला नागरिकांचा प्रतिसाद
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने विकसित केलेल्या ’पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाईल अॅपद्वारे नागरिकांना वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात थेट तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 15 जूनपासून आजवर तब्बल पाच हजार 859 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील चार हजार 414 प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई केली, तर अपूर्ण माहितीमुळे एक हजार 351 तक्रारी दुर्लक्षित केल्या आहेत.