कोंढवा: वानवडीतील शिवरकर रस्ता व साळुंखे विहार रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नुकतीच कारवाई केली. मात्र त्यानंतर परिसरातील अतिक्रमणे पुन्हा ’जैसे थे’ झाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.
यामुळे प्रशासनाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. या भागातील अतिक्रमणांचा प्रश्न कायमचा सोडविल्यास चौकात अधिकार्यांचा सन्माम करण्यात येईल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. (Latest Pune News)
वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शिवरकर रस्ता व साळुंखे विहार रस्त्यावरील अतिक्रमणांवर उपायुक्त संदीप खलाटे यांच्या आदेशानुसार बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने नुकतीच कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त अमोल पवार यांच्या नियंत्रणाखाली बांधकाम विभागाचे निरीक्षक मयूर इंगळे, अतिक्रमण निरीक्षक गणेश तारु, पंकज पालाकुडतेवार, विक्रम गोळे, सागर गव्हाळे, वैभव जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान व्यावसायिकांनी आपल्या दुकानांबाहेरील जागा काउंटर लावून खाद्य पदार्थांसह विविध वस्तुंची विक्री करणार्या विक्रेत्यांना दिल्याचे आढळून आली. तसेच साईट आणि फ्रंट मार्जिनमध्येही अतिक्रमणे केले होते. या कारवाईदरम्यान 11 लोखंडी स्टॉल काऊंटर, 2 हातगाड्या, 4 टेंन्ट, 17 शेड, 2 फ्रिज, 23 खुर्च्यांसह टेबल, लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
...तर अधिकार्यांचा सन्मान करू!
महापालिका प्रशासनाने शिवरकर रस्ता आणि साळुंखे विहार रस्त्यावरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई केली. परंतु त्यानंतर परिसरातील अतिक्रमणे पुन्हा ’जैसे थे’ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारवाईचा व्यावसायिकांवर कोणताही परिणाम झाला नाही.
यामुळे या परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने अतिक्रमणांचा प्रश्न कायमचा सोडविल्यास अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांचा चौकात सन्मान सोहळा आयोजित करु, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.