सांगवी, पिंपळे गुरवमध्ये पदपथांवर अतिक्रमण

सांगवी, पिंपळे गुरवमध्ये पदपथांवर अतिक्रमण
Published on
Updated on

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सांगवी वाहतूक शाखेचे अभय यामुळे सांगवी, पिंपळे गुरवमधील बहुतांश चौक आणि येथील स्मार्ट पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास होणारी वाहतूक कोंडी आणि पादचार्‍यांची होणारी गैरसोय याबाबत येथील नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

येथील काटेपुरम चौक, कृष्णा चौक, साई चौक, फेमस चौक, रामकृष्ण चौक, भगतसिंग चौक हे मुख्य चौक असून येथे सतत वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यातच रस्त्याच्या कडेला, पदपथाला लागून, पदपथावर नारळ पाणी विक्रेते, भाजी विक्रेते, फळविक्रेते यांच्या हातगाड्यांची तसेच पदपथावर कब्जा करून खासगी विक्रेत्यांची यामध्ये आणखीनच भर पडत आहे.

त्यामुळे भर चौकात रस्त्यावरच खरेदी करणारे आपली वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे पदपथ असून अडचण, नसून खोळंबा याप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस सायंकाळच्या सुमारास मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी भाजी विक्रेते, फळ विक्रेते पदपथाला लागून तर काही जण पदपथावरच ठिय्या मांडून विक्रेते व्यवसाय करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. अनेकदा नागरिक घराबाहेर कामानिमित्त अथवा फेरफटका मारण्यासाठी पडत असतात.

या वेळी पदपथ विक्रेत्यांनी गिळंकृत केल्याने पादचार्‍यांना नाईलाजाने धोका पत्करून जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत आहे. आम्ही धडपडावं असं वाटतंय का? असा संतप्त सवाल या वेळी नागरिक करीत आहेत. मात्र कारवाईनंतर काही वेळातच व्यावसायिक पुन्हा पदपथ काबीज करतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भर चौकातील असणारे अतिक्रमण काढून पदपथ नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे करण्यात यावे. अशी मागणी स्थानिकांसह त्रस्त वाहनचालकांकडून होत आहे.

पदपथावरून चालणे झाले अवघड…

पादचार्‍यांनी चालायचे कोठून? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालल्याशिवाय पर्याय नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी भर चौकात वाहनांच्या वर्दळीमुळे ठप्प होत असतो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना आपल्या हक्काच्या पदपथावरून चालणेही कठीण बनले आहे. पदपथ व्यावसायिकांनी बळकावल्याने पादचार्‍यांना वर्दळीच्या मार्गावरून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष असल्याने दिवसेंदिवस येथील चौकातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news