नारायणगाव बायपासला व्यावसायिकांचे अतिक्रमण
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे – नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला अनेक छोटे-मोठे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ््यांनी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला दोन्ही बाजूंनी रसवाले, फळ विक्रेते, कपडे वि क्रेते, प्लास्टिक वस्तु व खेळणी विक्रेते यांनी व्यवसाय थाटला आहे. इतर ठिकाणी हॉटेल व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले आहे. शासनाने आठ पदरी रस्त्यासाठी आरक्षित केलेल्या जागेवर व्यवसाय थाटण्यात आले आहेत. यांना वरदहस्त कोणाचा? संबंधित अधिकारी कारवाई का करत नाही? अपघात घडल्यास जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांनी केला आहे. नाशिक महामार्गावर नारायणगाव, आळेफाटा, पिंपळवाडी, मंचर, पेठ, खेड या हद्दीत व्यवसायिकांनी थेट रस्त्यावरच ठाण मांडले आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असतात ते म्हणाले, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना आम्ही नोटिस दिली आहे. नारायणगाव बायपासला दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केलेल्यांची माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. त्यांच्यावर देखील आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत.

