पुणे: रेंगाळलेल्या अतिक्रमण कारवाईला पुन्हा वेग येणार आहे. अतिक्रमणांच्या तक्रारीनंतर अतिक्रमणांवर नियमितपणे कारवाई करून त्याचा नियमित अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखांना दिले आहेत. अतिक्रमण कारवाईत टाळाटाळ करणार्यांना नोटीस बजाविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकांमध्ये अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश वारंवार दिले आहेत. (Latest Pune News)
मंत्रिमहोदयांच्या आदेशानुसार त्या-त्या वेळेस प्रशासनाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई थंडावली की पुन्हा अतिक्रमणे उभी राहत आहेत. धक्कादायक म्हणजे काही ठिकाणी अतिक्रमण विभागाचे स्थिर पथक असतानाही बिनधास्तपणे हातगाड्या, स्टॉल अशी अतिक्रमणे होत असल्याचे आढळून आले आहे.
यासंदर्भात कोंढवा व सिंहगड रस्त्यांवरील अतिक्रमणांसंदर्भात महापालिका आयुक्तांकडेच तक्रार आल्याने सोमवारी आयुक्त भोसले यांनी अतिक्रमणांवर सातत्यपूर्ण कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच स्थिर पथक असतानाही अनधिकृत व्यवसाय होत असल्यास संबंधित अधिकार्यांना नोटीस बजावण्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत व्यवसायाविरोधात कारवाई केली जात आहे. नामदार गोखले रस्त्यावर रविवारी सायंकाळी स्थिर पथक असतानाही अनधिकृत पथारी व्यवसाय सुरू होता.
त्यामुळे संबंधित अधिकार्यांना तातडीने खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील सर्वच भागांत अतिक्रमण विभाग, फिरती पथके, स्थिर पथकांना नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी स्पष्ट केले.