पुणे : पाच वर्षांत 28 हजार तरुणांना रोजगार

पुणे : पाच वर्षांत 28 हजार तरुणांना रोजगार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गेल्या पाच वर्षांत 44 रोजगार मेळावे घेण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजागार असलेल्या किमान 28 हजार तरुणांना रोजगार मिळाले . पाच वर्षांत झालेल्या रोजगार मेळाव्यामध्ये 530 उद्योजक सहभागी झाले होते. राज्यासह शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

चांगले शिक्षण असूनदेखील बर्‍याचदा शिक्षणाला साजेशी नोकरी न मिळाल्याने अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत जातात. मात्र, याच तरुणांना पुन्हा उभारी देण्याची कामगिरी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने गेल्या काही वर्षांपासून हाती घेतली आहे. त्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील विविध उद्योजकांना कोणत्या स्वरूपाचे नोकरदार हवे आहेत. त्यादृष्टीने चाचपणी करण्यात येते. त्यानुसार सर्वच प्रकारच्या नोकर्‍या तरुणांना कशा मिळतील, त्यादृष्टीने प्रयत्न या केंद्राच्या वतीने करण्यात येत आहेत.

दहावी, बारावी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना गेल्या काही वर्षांपासून शासकीय स्तरावर नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन खासगी उद्योगामध्ये आवडीच्या क्षेत्रात नोकर्‍या मिळवाव्या लागतात. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राकडे बेरोजगारांना आधार कार्ड नोंदणी करून सर्व माहिती भरता येते. तसेच अर्जही करण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पोर्टलवर आतापर्यंत सुमारे पाच लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत 18 पेक्षा अधिक रोजगार मेळावे ऑनलाइन घेण्यात आले होते. या मेळाव्यातही उद्योजक, उमेदवारांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला होता.

वर्ष 17-18 18-19 19-20 20-21 2122 22-23
मेळावे 8 6 4 8 9 9
उद्योजक 222 235 89 90 57 137
रिक्त पदे 29495 30792 8361 24125 15590 19275
उमेदवार 12660 36949 3935 68715 25936 13825
निवड संख्या 7322 9081 1733 4944 3150 1737

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news