प्रदीप बलाढे
वारजे : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची वेळ सकाळी पावणेदहा असली, तर या कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे दिसून आले. एकंदरीत कार्यालयात वेळेचे बंधन नसल्याचे चित्र या वेळी दिसून आले. या कार्यालयामध्ये काही अधिकारी व कर्मचारी सकाळी पावणेदहाऐवजी सव्वादहा ते साडेदहाच्या दरम्यान येत असल्याचे चित्र दिसून आले.
काही अधिकारी व कर्मचारी उशिरा येऊनही कार्यालयाबाहेरील चहाच्या ठेल्यावर चहा पिण्यासाठी गेले आणि त्यानंतरच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. कर्मचार्यांच्या या निवांतपणाचा फटका विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना बसत आहे. आपले काम करून घेण्यासाठी अनेक नागरिक आपल्या कामातून वेळ काढून येत असतात. मात्र, कार्यालयातील उशिरा व वेळ दवडणार्या या अधिकारी व कर्मचार्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचार्यांना संबंधित अधिकारी आलेत का? असे विचारल्यानंतर साहेब येतानाच साइट व्हिजिटला गेल्याचे त्यांनी सांगितले. तर काही टेबलवर विचारणा केली असता, साहेब आताच बाहेर (कार्यालयाच्या खाली) गेल्याचे सांगण्यात आले. अनेक कक्षांमधील खुर्च्या रिकाम्याच असल्याचे चित्र या वेळी पाहावयास मिळाले.
कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित आहे. स्थापत्य विभाग, घनकचरा, टॅक्स विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांतील अधिकारी, कर्मचारी बाहेर काम करीत असतात. काही जण सकाळी साइट व्हिजिटला जातात, तर बाकी सर्व वेळेतच येत असतात.
– राजेश गुर्रम,
सहायक आयुक्त, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय