

पुणे: संस्थेत काम करणार्या महिलेला ‘तू खूप छान दिसतेस’ म्हणत तिचा हात पकडून छेड काढल्याचा प्रकार बावधन परिसरातील रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आरआयआयएम) येथे घडला आहे.
याप्रकरणी आरआयआयएमचे अध्यक्ष सूरज शर्मा (रा. बावधन) यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 5 मे ते 15 मेच्या दरम्यान घडली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एप्रिल महिन्यात आरआयआयएम संस्थेत रुजू झाली होती. संस्थेचे अध्यक्ष सुरज शर्मा हे फिर्यादीला वेळोवेळी कार्यालयात बोलावून हात दाबणे, हात धरून न सोडणे, वैयक्तिक टिप्पण्या करत. फिर्यादी महिला कामानिमित्त बाहेर गेली असतांना शर्मा हा विद्यार्थ्यांसमोर आमच्या मॅडम कशा वाटतात असे बोलत.
तसेच एके दिवशी ‘तू खूप छान दिसतेस,’ असे बोलून फिर्यादी महिलेचा हात पकडून त्यांना जवळ ओढले आणि लज्जा वाटेल असे वर्तन केले. तसेच संस्थेने आयोजित पार्टीला फिर्यादी उपस्थित राहत नसल्याचे कारण देत तिला संस्थेतून काढून टाकल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
मनविसेकडून संबंधित संस्थेत आंदोलन
या संदर्भात आरआयआयएमच्या अध्यक्ष शर्मावर गुन्हा दाखल असून त्याला अद्याप अटक का केली नाही, याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून संबंधित संस्थेत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी शर्मा विरोधात घोषणाबाजी करत मराठी महिलेवर अत्याचार करणार्या परप्रांतीय सूरज शर्माला अटक झालीच पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.