बेलसर : वादापेक्षा कामांत सुरळीतपणा आणण्यावर भर : आ. जगताप

बेलसर : वादापेक्षा कामांत सुरळीतपणा आणण्यावर भर : आ. जगताप

बेलसर; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजना तसेच इतर विकासकामांबाबत श्रेयवाद करण्यापेक्षा या कामांत सुरळीतपणा आणि सुसूत्रता आणण्याबाबत भर देत असल्याचे स्पष्ट केले. वाघापूर येथील घाटमाथ्यावरील पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा क्र. 5 येथे योजनेचा आढावा आणि उन्हाळी हंगाम पाणीपुरवठा नियोजन बैठक आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. याप्रसंगी विजय कोलते, सुदाम इंगळे, प्रदीप पोमण, सुनीता कोलते, गणेश जगताप, माउली यादव यांसह सरपंच, सदस्य, पदाधिकारी, शेतकरी, अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.

आमदार संजय जगताप यांनी, प्रत्येक पाझर तलावापर्यंत योजनेची पाइप लाइन करणार आहे. पाझर तलाव भरून ठेवण्यासाठीही पैसे कमी लागतील, असे सांगितले. योजनेमुळे पुरंदरचे ऊस उत्पादन दीड लाख टनांवरून साडेपाच लाख टनांपर्यंत गेले आहे. पुरंदरसाठी सोमेश्वर कारखान्याच्या एका युनिटची मागणी केल्याचेही सांगितले. पाणी जात नसलेल्या ठिकाणी अभियंत्यांना बरोबर घेऊन पाइप लाइनबाबत पाहणी करू. योजनेला सौरऊर्जेच्या आधाराची मागणी केल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले.

खासदार सुळे आणि आमदार जगताप यांनी योजनेच्या दुरुस्तीसाठी 67 कोटी 69 लाखांचा निधी मिळविला तसेच वीजदर 3 रुपये 56 पैशांवरून 1 रुपये 16 पैसे प्रतियुनिट करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा दर 32 हजार रुपये प्रतिएमसीएफटीवरून 18 हजार 900 रुपये झाला. याबद्दल खासदार सुळे आणि आमदार जगताप यांचे या बैठकीत लाभार्थी शेतकर्‍यांनी अभिनंदन केले.

तसेच आ. जगताप यांचा पेढे भरवून सत्कार केला. शेतकर्‍यांनी, पैसे भरल्याच्या आणि पाणी मागणी केल्याच्या क्रमानुसार पाणीपुरवठा वेळेत करा, चांगल्या दाबाने पाणी सोडा आदी मागण्या केल्या. कार्यकारी अभियंता महेश कानिटकर यांनी दुरुस्तीमुळे एकच पंप सुरू होता यापुढे वेळेत पाणीपुरवठा होईल, मागणीप्रमाणे पाणी सोडले जाईल, असे सांगितले.

विकासकामांत राजकारण नको
पुरंदरमध्ये आजपर्यंत पाण्यावर राजकारण झाले. मात्र, आता पाण्यासह रस्ते, समाजमंदिर, पाणंद रस्ते आदी विकासकामांतही काही लोक गावोगावी राजकारण करून विकासकामांत अडथळे आणत आहेत. गावोगावच्या अशा मंडळींकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन विजय कोलते आणि सुदाम इंगळे यांनी या वेळी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news