खाली विजेच्या तारा अन् वर होर्डिंग! वाघोली परिसरातील चित्र

खाली विजेच्या तारा अन् वर होर्डिंग! वाघोली परिसरातील चित्र

[author title="दीपक नायक" image="http://"][/author]

वाघोली : वाघोली येथे पुणे-नगर महामार्गासह इतर अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांजवळ महावितरण कंपनीची 'एनओसी' न घेताच होर्डिंग उभारण्यात आली आहेत. होर्डिंगच्या अगदी खालून काही फुटांवर विजेच्या तारा गेल्या असल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याचा धोका आहे. विजेच्या वाहिन्यांलगत असलेल्या होर्डिंगला संबंधित विभागाने परवानगी कशी दिली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाघोली येथे नगर महामार्ग परिसरात मोठ्या संख्येने होर्डिंग आहेत. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर होर्डिंग उभारले आहेत. होर्डिंगच्या खालून विद्युत वाहिन्या असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होर्डिंग उभारण्यासाठी महावितरणची कुठलीही परवानगी घेतली गेली नाही. घाटकोपर येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. जोराच्या वार्‍यामुळे होर्डिंगचे फाटलेले फ्लेक्स विद्युत वाहिन्यांना गुंडाळले जातात. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होतो. अशावेळी वीजपुरवठा सुरळीत करताना महावितरणच्या कर्मचार्‍यांना नागरिकांचा रोष पत्करावा लागत आहे. याबाबत नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर व परवाना निरीक्षक हाशम पटेल यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

होर्डिंग परवानगी देण्यासाठी अद्यापपर्यंत कधीच महावितरणकडून 'एनओसी' घेण्यात आली नाही. परवानगी देताना हार्डिंगच्या ठिकाणाहून कमी व उच्च दाबाची वाहिनी जाते का, याबाबत संबंधित विभागाने महावितरणची 'एनओसी' घ्यावी. त्यानंतरच होर्डिंगला परवानगी द्यावी.

– दीपक बाबर, सहायक अभियंता, महावितरण वाघोली विभाग

धोकादायक होर्डिंगचा सर्व्हे सुरू आहे. आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत 30 होर्डिंग काढण्यात आले आत्त. परिसरातील सर्व धोकादायक होर्डिंग काढण्यात येणार आहेत.

– सोमनाथ बनकर, सहायक आयुक्त, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय

महापालिका प्रशासनाकडून धोकादायक होर्डिंगधारकांना नोटीस देण्यात येत असून, लवकरच पुढील कारवाई केली जाईल.

– हाशम पटेल, परवाना निरीक्षक, आकाशचिन्ह, महापालिका

धोकादायक होर्डिंगमुळे दुर्घटनेची शक्यता

अनेक वर्षांपासून वर्दळीच्या ठिकाणी उभे असलेले होर्डिंग ऊन, वारा आणि पावसामुळे गंजून कमकुवत झाले आहेत. अशा धोकादायक होर्डिंगची परवाना व आकाशचिन्ह विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे; अन्यथा दुर्घटना होण्याचा धोका नाकारता येत नाही. गेल्या एप्रिल महिन्यात एकूण 96 होर्डिंगचे फ्लेक्स उडून विजेच्या तारांवर पडले होते. तसेच, उबाळेनगर परिसरात एक होर्डिंग उच्च दाबाच्या वाहिनीवर पडले होते. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news