येरवडा : वृद्ध रिक्षाचालकाचा झाड पडून मृत्यू

येरवडा : वृद्ध रिक्षाचालकाचा झाड पडून मृत्यू

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: येरवडा येथे शुक्रवारी वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे रामनगरमधील पिंपळाचे झाड चालत्या रिक्षावर कोसळले. यात ज्येष्ठ रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दोन रिक्षांसह चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याच घटनेत सॅम्युल रॉबर्ट हा रिक्षाचालक सुदैवाने बचावला.

जितसिंग सुंगर (वय 60, रा. जय जवाननगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. रामनगर येथून जितसिंग हे रिक्षा घेऊन जात असताना भर वस्तीत घरासमोर असलेले 50 वर्षांपूर्वीचे झाड त्यांच्या रिक्षावर कोसळले. झाडाचा आकार मोठा असल्याने त्यांना रिक्षाबाहेर पडता आले नाही.

माजी नगरसेवक संजय भोसले यांनी महापालिकेला माहिती दिल्यानंतर जेसीबी व कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात आल्या. जितसिंग यांचे दोन्ही पाय रिक्षात अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर जितसिंग यांचा मृतदेह रिक्षातून बाहेर काढला व तो रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात पाठविला. जितसिंग हे गरीब असून त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news