

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 2022 मध्ये जी प्रभागरचना होती, तीच प्रभागरचना राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी कायम राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.
राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय कार्यशाळेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाचे काम सुरू झाले आहे. (Latest Pune News)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2022 नुसारच प्रभाग रचना असेल, आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढलो. आता येणार्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात (डीपी) काही त्रुटी होत्या, त्यावर आक्षेप आले होते. या त्रुटी दूर करून नवीन डीपीमध्ये सर्वसामान्यांचे हित जपले जाईल.
तुर्कस्थानला धडा शिकवणार्या व्यापार्यांचे अभिनंदन
तुर्कस्थानने पाकिस्तानला पाठिंबा दिला असून त्यांच्या या पापामुळे त्यांना धडा शिकवणार्या व्यापार्यांचे अभिनंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. शिंदे म्हणाले, व्यापार्यांनी कसल्याही धमक्यांना घाबरू नये, सरकार त्यांच्या सोबत आहे. राज्यभर भारतीय लष्कराच्या तिन्ही दल यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे, अशी माहिती देखील शिंदे यांनी यावेळी दिली.