

प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत साडेआठ लाख जागा रिक्त राहण्याची शक्यता
राज्यात अकरावी प्रवेशाच्या 20 लाखांवर जागा, तर दहावी उत्तीर्ण केवळ साडेचौदा लाख
विज्ञान शाखेच्या साडेआठ लाख, कला शाखेच्या साडेसहा लाख, तर वाणिज्य शाखेच्या 5 लाखांवर जागा
गणेश खळदकर
पुणे : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील 9 हजार 320 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे 20 लाख 43 हजार 254 जागा उपलब्ध झाल्या आहेत. परंतु, दहावीची परीक्षा केवळ 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने जरी अकरावीला प्रवेश घेतला, तरी तब्बल 5 लाख 87 हजार 821 जागांवर विद्यार्थीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साधारण साडेआठ लाख जागा अकरावीच्या रिक्तच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. राज्यात आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात होती. त्या अंतर्गत 1 हजार 730 महाविद्यालयांंतील सुमारे सव्वा सहा लाख जागांवर साडेचार लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते. आता संपूर्ण राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी https:///mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ कार्यन्वित केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया 21 मेपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यंदा विज्ञान शाखेच्या 8 लाख 52 हजार 206 जागा, वाणिज्य शाखेच्या 5 लाख 40 हजार 312 आणि कला शाखेच्या 6 लाख 50 हजार 682 अशा एकूण सुमारे 20 लाख 43 हजार 254 जागा उपलब्ध झाल्या आहेत. तर दहावीच्या नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षेसाठी 15 लाख 58 हजार 20 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 5 लाख 87 हजार 821 जागांवर विद्यार्थीच मिळणार नाहीत.
गेल्या काही वर्षात दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका आणि आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यंदा आयटीआयच्या दीड लाखांवर जागा उपलब्ध आहेत.