

पुणे : तंत्रशिक्षण विभागाच्या पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवावीत, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले.
प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आवश्यक आहेत त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम, बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका व पदवी अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच एमई अथवा एमटेक, एमसीए, एमबीए या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविली जाते. (Pune News Update)
प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रावर केली जाते. ऐनवेळी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी आतापासून सुरुवात करावी, असेही तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. परंतु, पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमातीव्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलेअर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सैन्यदलातील अथवा अल्पसंख्याक संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणार्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे महत्त्वाची आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या संवर्गातून निश्चित केला जाईल, असेही तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
1) जात प्रमाणपत्र 2) जात वैधता प्रमाणपत्र 3) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र 4) डोमिसाईल प्रमाणपत्र 5) उत्पन्नाचे प्रमाणपत्र 6) ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र 7) अपंगत्वाचे प्रमाणपत्र 8) आधार क्रमांक 9) वर्किंग प्रोफेशनल्ससाठी अनुभव प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र
बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना चाप बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.