

MCF virus in spotted deer
पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील 16 चितळांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या रक्ताचे नमुने देशातील विविध प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. भोपाळ येथील आयसीएआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस प्रयोगशाळेनेदेखील त्यांचा अहवाल सादर केला असून, चितळांना लाळ-खुरकतसह मॅलिग्नंट कॅटरल फीव्हर (एमसीएफ) या विषाणूचीदेखील लागण झाल्याचे समोर आले आहे. वन्यप्राणी या विषाणूने बाधित असल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. हा विषाणू मानवासाठी धोकादायक नसला, तरी वन्यजीव आणि पशुधनासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. (Latest Pune News)
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 6 ते 12 जुलैदरम्यान 16 चितळांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या चितळांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, हे तपासण्यासाठी प्राणिसंग्रहालयाने मृत प्राण्यांचे नमुने भारतातील विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवले होते.
24 जुलै रोजी आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन फूट अँड माउथ डिसीज (भुवनेश्वर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज (भोपाळ) यांनी दिलेल्या अहवालात हरणांचा मृत्यू ‘लाळ-खुरकत’ने झाल्याचे निष्पन्न झाले.
तर 29 जुलै रोजी आयसीएआर-एनआयएचएसएडीने दिलेल्या अहवालानुसार काही मृत चितळांमध्ये ‘एमसीएफ’ विषाणू आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे, केंद्रीय मंत्रालयाने राज्यातील अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने 5 ऑगस्टला जारी केलेल्या अधिकृत पत्रकात, वन्य प्राण्यांमध्ये एमसीएफ विषाणू आढळणे ही बाब गंभीर व चिंताजनक असल्याचे म्हटले आहे, कारण देशातील वन्य प्राण्यांमध्ये यापूर्वी कधीही हा विषाणू आढळला नाही. हा आजार प्रामुख्याने ओव्हिन हर्पेसव्हायरस-2 (ओव्हीएचव्ही-2) मुळे होतो. वन्य आणि पाळीव प्राण्यांना या विषाणूचा मोठा धोका आहे. या विषाणूवर कोणताही प्रभावी उपचार किंवा लस उपलब्ध नाही.
मंत्रालयाने महाराष्ट्र वन आणि पशुसंवर्धन विभागांना व प्राणिसंग्रहालयांना या विषाणूपासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हरीण, गवा आणि काळवीट यासारख्या संवेदनशील प्राण्यांच्या प्रकृतीवर अधिक देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कोणत्याही असामान्य आजाराने प्राण्यांचा मृत्यू झाल्यास याची माहिती देण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी 6 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात वनविभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एमसीएफ हा वन्य आणि पाळीव प्राण्यांच्या दृष्टीने अत्यंत घातक रोग आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्राणिसंग्रहालयांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.
राजीव गांधी प्राणिशास्त्र उद्यानाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले, ’राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांमध्ये हा विषाणू आढळल्याचे वृत्त चुकीचे आहे. हा विषाणू सामान्यतः शेळ्या, मेंढ्या, गुरे-ढोरे आणि इतर पशुधनांमध्ये आढळतो. प्राणिसंग्रहालयात हा विषाणू पहिल्यांदाच आढळल्याचा दावा चुकीचा आहे. आम्ही प्राण्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करत असून, लसीकरणदेखील केले आहे. येथील सर्व प्राणी निरोगी आहेत.
नाव न छापण्याच्या अटीवर एका वन्यजीव तज्ज्ञाने सांगितले की, ‘भारतात वन्यजीवांमध्ये एमसीएफचा विषाणू या पूर्वी आढळला नव्हता. हा एक गंभीर विषाणू आहे. वेळेवर निदान अथवा उपचार न मिळाल्यास 1-3 दिवसांत प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे प्राण्यांची रोज आरोग्यविषयक काळजी घेणे गरजेचे आहे.
एमसीएफ विषाणू काय आहे?
एमसीएफ विषाणू हा धोकादायक आहे. या विषाणूचा प्रसार झाल्यास वन्यप्राणी अथवा पशूधनाच्या मृत्यूदर हा वेगाने वाढतो. हा विषाणू शेळ्या आणि मेंढयांमध्ये प्रामुख्याने आढळतो. ते या विषाणूचे वाहक असतात. हा विषाणू दुर्मिळ असून, प्राणघातकदेखील आहे. या विषाणूजन्य आजार गुरे-ढोरे, बायसन आणि हरीण यांसारख्या प्राण्यांना होतो. हा विषाणू प्राण्यांकडून नाक आणि डोळ्यांच्या स्रावांद्वारे पसरतो. या विषाणूचा मानवाला धोका नाही. आजारी प्राण्यांना ताप येणे, डोळे आणि नाकातून स्त्राव होणे, तोंडात फोड येणे, अशी लक्षणे यात दिसतात. अशा प्राण्यांना विलगीकरणात ठेवणे गरजेचे असते.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात मृत्यूमुखी पडलेल्या चितळांच्या नमुन्यांमध्ये एमसीएफ हा प्राणघातक विषाणू आढळल्याचा अहवाल अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन संबंधित अधिकार्यांना योग्य सूचना दिल्या जातील.
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका