

Rohit Pawar MSCB case
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे अडचणीत आले आहेत. ईडीच्या आरोपपत्रात पवार कुटुंबातील व्यक्तीचे नाव आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, हे प्रकरण नेमके काय, आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव का आहे, रोहित पवारांनी या आरोपांवर काय म्हटलंय जाणून घेऊया..
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडने अवसायनात निघालेला छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी कारखाना खरेदी केला. हा साखर कारखान्याची केवळ ५० कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. नियमांचे पालन न करता हा व्यवहार झाला असून हा कारखाना जाणूनबुजून कमी किमतीत विकण्यात आला, असा संशय ईडीला आहे.
ईडीच्या या पुरवणी आरोपपत्रावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत X वर पोस्ट शेअर केली आहे. ''कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…!'' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
२०११ मध्ये शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर सरकारने बँकेचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली होती, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. हा विक्री व्यवहाराचा बँकेच्या संचालकांच्या नातेवाईकांशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही, असेही आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले होते.
रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, यातून कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा सिद्ध होत नाही. त्यात असेही नमूद करण्यात आले होते की रोहित पवार, त्यांचे काका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांत कोणतीही अनियमितता आढळून आली नाही.
जानेवारी २०२४ मध्ये हा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. पण न्यायालयाने अद्याप तो स्वीकारलेला नाही. बँकेचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झालेले नसून बँकेने जे कर्ज दिले होते त्यातील आतापर्यंत १,३४३.४१ कोटी रुपये वसूल केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आढळून आले आहे, असे क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले होते.
शिखर बँकेतील कथित अनियमिततेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. त्यांना २०२४ मध्ये ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणात समन्स बजावले होते. त्यानंतर ते चौकशीसाठी ईडीसमोर हजरही झाले. ईडीने तपास केलेले हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे.
या प्रकरणात ईडीने यापूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, त्यांचे वडील प्रसाद तनपुरे, रणजीत देशमुख, सुभाष देशमुख, उद्योजक समीर मुळ्ये, अर्जुन खोतकर आणि बांधकाम व्यावसायिक जुगल तापडिया यांच्यासह १४ जणांच्या नावांचा समावेश होता. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक अधिकाऱ्यांनी नियम डावलून साखर कारखान्यांना दिलेली कर्जे आणि कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.