

पुणे: खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणीची मुदत 14 सप्टेंबर आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही.
काही ठिकाणी 20 सप्टेंबरपर्यत करण्यात आली आहे. त्यानंतर सहाय्यकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे 40 टक्के अर्थात 67 लाख 19 हजार हेक्टर झाली आहे, अशी माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. (Latest Pune News)
खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते 14 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी करता आली नव्हती. तसेच काही शेतकऱ्यांनी आधी पेरलेल्या पिकांची नोंदणी केली. मात्र, अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.
परिणामी, पीक पाहणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार पिकांच्या नोंदणीसाठी अतिरिक्त सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आता 20 सप्टेंबर असेल. त्यानंतर 21 सप्टेंबरपासून 4 नोव्हेंबरपासून सहाय्यक ही ई-पीक पाहणी करणार असल्याची माहिती नरके यांनी दिली.
दरम्यान, राज्यात शनिवारपर्यंत (दि. 13) एकूण 67 लाख 19 हजार 652 हेक्टरवरील खरीप आणि बहुवर्षीय पिकांची नोंदणी झाली होती. त्यात 30 लाख हेक्टर सोयाबीन पिकाची नोंदणी झाली आहे. राज्यात 2019 पूर्वी खरीपातील सरासरी पेरणी क्षेत्र 1 कोटी 69 लाख 22 हजार 967 हेक्टर इतके आहे. त्यानुसार नोंदणी केलेले क्षेत्र 39.71 टक्के आहे. मात्र, 2029 ते 2023 या काळातील शास्त्रीयदृष्ट्या सरासरी पेरणी क्षेत्र 1 कोटी 50 लाख हेक्टर आहे. त्यानुसार यंदाचे नोंदणी केलेले क्षेत्र सुमारे 45 टक्के इतके आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.