Pune : कापूरव्होळ-मांढरदेवी रस्त्यावर धुळीचे लोट

Pune : कापूरव्होळ-मांढरदेवी रस्त्यावर धुळीचे लोट

भोर : पुढारी वृत्तसेवा :  कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना न केल्याने रस्त्यावर धुळीचे लोट पसरत आहेत. त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. धूळ कमी करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने उपाययोजना करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे. कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मे महिन्यापासून या कामास सुरुवात झाली. कापूरव्होळ ते भोर या 15 किलोमीटरच्या अंतरावरील सर्वच ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. काही दिवसांतच मांढरदेवी यात्रा सुरू होणार आहे. तत्पूर्वीच या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धुळीमुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे.

कासुर्डी ते आळंदे आणि नेकलेस पॉइंट ते भाटघर धरणापर्यंतच्या मार्गावर धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. धुळीचा त्रास हा केवळ दुचाकीस्वारांनाच नव्हे, तर मोटारीतून आणि एसटीतून जाणार्‍या प्रवाशांनाही होत आहे. याची योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.

धूळ कमी करण्यासाठी संबंधित ठेकेदारास रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात पाणी मारण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी, प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे.
      – संजय वागज, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news