सोमेश्वरनगर : दसरा-दिवाळी, लग्नसराईत सोने महागणार

File Photo
File Photo

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरवाढीचे सूतोवाच अगोदरच केल्याने जवळपास 2 हजार रुपये तोळ्यामागे सोन्याचे भाव अचानक कमी झाले आहेत, त्यामुळे सणासुदीसाठी आणि लग्नसराईसाठी सोने खरेदीसाठी किंवा बुकिंगसाठी हीच योग्य वेळ असल्याचे इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राज्य समन्वयक व बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.

दिवाळी आणि लग्नसराईमध्ये सोन्याची मागणी वाढणार आहे. याशिवाय दिवाळीनंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे दागिने, प्रदर्शन भरत असतात. यातून ग्राहकांच्या पसंतीची विविध प्रकारची डिझाइन बनवली जातात. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला, तर सोन्याचा भाव 55 हजार रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता आळंदीकर यांनी व्यक्त केली. चांदीही मागील 15 दिवसांत नीचांकी दरावर आली असून, 52 हजार 200 रुपये किलोपर्यंत खाली आली होती, त्यामध्ये वाढ होऊन 58 हजार रुपये किलोपर्यंत पुन्हा भाववाढ़ झाली.

फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढविले की सोन्याचे दर कमी होतात आणि व्याजदर कमी केले की सोन्याचे दर वाढतात, असे आजपर्यंतचे समीकरण आहे. परंतु, असे असले तरी मौल्यवान धातूंची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी, राजकीय तणाव, व्यापारातील अडथळे, महागाई, डॉलर निर्देशांक, चलनातील चढउतार आदी घटकांवर अवलंबून असते, असे किरण आळंदीकर यांनी सांगितले. सध्या 24 कॅरेट सोन्याला 49 हजार 900 रुपये प्रतितोळा आणि 22 कॅरेट सोन्यासाठी 46 हजार 700 रुपये प्रतितोळा दर आकारले जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news